अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात होस्ट बनला शाहरुख खान; स्टेजवर येताच म्हणाला, 'जय श्रीराम'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:13 PM2024-03-03T13:13:48+5:302024-03-03T13:15:01+5:30
काळा कुर्ता, पायजमा आणि जॅकेट अशा रॉयल लूकमध्ये किंग खानने एन्ट्री घेतली.
अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याची देशभरात चर्चा आहे. गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) प्री वेडिंग सोहळा १ ते ३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी हॉलिवूडची स्टार गायिका रिहानाच्या परफॉर्मन्सने रंगत आणली. तर काल म्हणजेच 2 मार्च रोजी जामनगरचं वातावरण बॉलिवूडमय झालं. यावेळी शाहरुख, सलमान आणि आमिर तीनही खाननेही स्टेजवर आग लावली. किंग खानने काही वेळासाठी स्टेजवर येत होस्ट केलं. तेव्हा त्याने स्टेजवर एन्ट्री घेताच जय श्रीराम म्हणत सर्वांचं मन जिंकलं.
काळा कुर्ता, पायजमा आणि जॅकेट अशा लूकमध्ये शाहरुख खानने (Shahrukh Khan)अंबानींच्या कालच्या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याने स्टेजवर येत अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या. एन्ट्रीच्या वेळीच त्याने सर्वांना 'जय श्रीराम' अशी सुरुवात केल्याने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. उपस्थितांकडून एकच जल्लोष पाहायला मिळाला. शाहरुख म्हणाला, "जय श्रीराम. देव तुम्हा सर्वांचं भलं करो. सगळ्यांना आशीर्वाद मिळो. तुम्ही अनेक दमदार परफॉर्मन्स तर पाहिलेच. भाऊ-बहीण, काका-काकी, हिरो हिरोईन, अंकल-आंटी सर्वांचे परफॉर्मन्स झाले. हम साथ साथ ही जी आपली एकता आहे ती केवळ त्याच्या आशीर्वादामुळेच आहे." यानंतर शाहरुखने अंबानी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची ओळख करुन दिली. कोकिलाबेन अंबानी, पूर्णिमा दलाल आणि देवयानी खिमजी यांनी स्क्रीनवर येत अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या. या तिघींचा शाहरुखने 'पॉवरपफ गर्ल्स', 'अंबानीज् एंजल्स' असा उल्लेख केला.
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी सध्या प्रीवेडिंग फंक्शनसाठी कुटुंबियांनी जामनगरची निवड केली. आज या सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. जगभरातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावत अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या.