मध्यरात्री बिल्डिंगमध्ये लागली आग, अभिनेत्याची पत्नी अन् मुलगी घरात अडकली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 02:27 PM2023-01-26T14:27:40+5:302023-01-26T14:28:56+5:30
२५ जानेवारीच्या रात्री शाहीर शेखच्या बिल्डिंगमध्ये आग लागल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं.
मुंबई - टीव्ही अभिनेता शाहीर शेखबाबत हैराण करणारी घटना घडली आहे. २५ जानेवारीच्या रात्री शहीर शेखच्या बिल्डिंगमध्ये आग लागल्यानं खळबळ माजली. अभिनेत्याची पत्नी रुचिका कपूरनं ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. या घटनेत अभिनेत्याने पत्नी आणि १६ महिन्याच्या लहान मुलीचा जीव वाचवला. त्याबद्दल नेटिझन्स आणि फिल्म जगतातील सहकारी कलाकारांनी अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
२५ जानेवारीच्या रात्री शाहीर शेखच्या बिल्डिंगमध्ये आग लागल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. इन्स्टाग्रामवर शाहीरची पत्नी रुचिकाने पोस्ट केली आहे. त्यात तिने म्हटलंय की, रात्री दीड वाजता मला कॉल आला आपल्या बिल्डिंगमध्ये आग लागलीय. दरवाजा उघडताच डोळ्यासमोर काळा धूर पसरला होता. आम्हाला माहिती होते वाट पाहावी लागेल. परंतु तिथून पळता येणेही शक्य नव्हते. हे दृश्य पाहून मी खूप घाबरले. मी शाहीरला कॉल करून घटनेबद्दल माहिती दिली. हे सांगून मला त्याला टेन्शन द्यायचे नव्हते कारण या घटनेची माहिती मिळताच शाहीर चिंताग्रस्त झाला.
तर माझी मुलगी केवळ १६ महिन्याची होती. पप्पा व्हिलचेअरवर होते. त्यांना सोबत घेऊन तिथून पळणे शक्य नव्हते. धुरापासून वाचण्यासाठी आम्ही ओल्या टॉवेलने तोंड बांधून घेतले. त्यानंतर शाहीर आणि त्यांचा भाऊ फायर फायटर्ससह आम्हाला वाचवण्यासाठी आले. या दुर्घटनेबाबत सांगताना रुचिकानं अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरक्षित वाचलो असं सांगितले. त्यानंतर आम्ही फायर फायटर्सचे आभार मानले.
रुचिकाची पोस्ट वाचून फॅन्स आणि अनेक सेलेब्रिटीने पोस्टवर रिएक्ट केले आहे. आयुष्मानने पोस्टवर कमेंट करत म्हटलं की, आशा आहे, आता तुम्ही सगळे ठीक असाल. तर सोनम कपूरने यावर प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली. हे खूप भयानक चित्र आहे असं ती म्हणाली. त्याचसोबत अनिता हस्सनंदनी यांनी तुम्ही सगळे ठीक आहात हे छान आहे. तसेच कंगना रणौतनं भावूक होत तुम्हाला या संकटातून जावं लागले त्यावर चिंता व्यक्त केली.