शाहिद कपूरला राग आला की तो करतो ही गोष्ट... त्यानेच दिली याविषयी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:00 AM2019-06-15T06:00:00+5:302019-06-15T06:00:03+5:30
कपिल शर्मासोबत कबीर सिंह या चित्रपटाविषयी बोलताना शाहिद कपूरने एक खास गोष्ट सांगितली.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात शाहिद कपूर आणि कियारा अडवानी त्यांच्या ‘कबीर सिंह’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत.
कपिल शर्मासोबत कबीर सिंह या चित्रपटाविषयी बोलताना शाहिद कपूरने एक खास गोष्ट सांगितली. त्याने सांगितले, कबीर सिंह या चित्रपटात त्याची भूमिका खूपच वेगळी असून काहीशी नकारात्मक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना तो अक्षरशः या भूमिकेत जीव ओतत असे. घरी आल्यानंतर या भूमिकेतील नकारात्मक गोष्टींचा पत्नी आणि मुलांवर परिणाम होऊ नये यासाठी तो एक गोष्ट आवर्जून करत असे. चित्रीकरण संपल्यानंतर या भूमिकेतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी तो काय करत असे हे ऐकल्यावर तुम्हाला देखीाल हसू कोसळेल.
याविषयी शाहिद कपूरने सांगितले की, “मी अनेक गंभीर चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ‘कबीर सिंह’ हासुद्धा असाच चित्रपट आहे. या चित्रपटासाठी मी खूप तयारी केली आहे. चित्रपटातील माझी भूमिका सतत रागावलेल्या माणसाची असल्याने मी चित्रीकरणानंतर दोन तास तरी आंघोळ करून माझे चित्त थार्यावर आणत असे. जेणेकरून मी सामान्य होत असे आणि माझी पत्नी आणि मुलांवर या भूमिकेतील नकारात्मकतेचा परिणाम होत नसे.”
शाहिद आणि कियारा यांनी या कार्यक्रमात त्यांचे अनेक सिक्रेट कपिल आणि त्याच्या टीमसोबत शेअर केले. शाहिद भूमिका निवडण्याच्या बाबतीत चोखंदळ आहे आणि भूमिकेतील बारकावे मोठ्या पडद्यावर सुंदररित्या मांडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्याचा परिवार त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे शूट झाल्यावर घरी जाताना तो संपूर्णपणे भूमिकेतून बाहेर येईल याची काळजी घेतो.
शाहिद कपूरने द कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या खऱ्या आयुष्यातील एक गोष्ट देखील सांगितली. वास्तविक जीवनात जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो काय करतो असे विचारले असता त्याने सांगितले की, मी राग शांत करण्यासाठी खोलीच्या एका कोपर्यात शांतपणे बसून राहतो. माझ्या नकारात्मक मनःस्थितीचा प्रभाव दुसर्यावर पडू नये असे मला वाटते.