प्रियंका चोप्राच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा या अभिनेत्याने उघडला होता दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 06:00 AM2020-04-17T06:00:00+5:302020-04-17T06:00:02+5:30
प्रियंकाच्या घरी सकाळी साडे सात वाजता इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी या प्रसिद्ध अभिनेत्याने दरवाजा उघडला होता.
शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एकेकाळी शाहिद-करिना इतक्याच शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्या अफेअरच्या बातम्याही गाजल्या होत्या. रिल लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते. पण अचानक रिअल लाईफमध्ये या जोडीचे ब्रेकअप झाले आणि चाहत्यांची निराशा झाली.
करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदच्या आयुष्यात प्रियंकाची एन्ट्री झाली होती. 2007 मध्ये ‘जब वी मेट’च्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्या नात्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. अखेर करिना आणि शाहिद कायमचे दूर झाले. करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. या अनेकींपैकीच एक होती प्रियंका चोप्रा. प्रियंका आणि शाहिदच्या अफेअरच्या नको इतक्या गाजल्या.
प्रियंका आणि शाहिद यांनी ‘कमीने’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ यासारख्या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये ‘कमीने’च्या शूटींगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. ‘कमीने’ हिट झाला आणि पाठोपाठ शाहिद व प्रियंकाची जोडीही हिट झाली. इतकेच नाही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या लोकप्रिय शोमध्येही ही जोडी एकत्र दिसली. यानंतर अनेक ठिकाणी ही जोडी एकत्र दिसायला लागली होती. साहजिकच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना बळ मिळाले. याचदरम्यान अशी एक घटना घडली की, या दोघांच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले.
प्रियंका आणि शाहिदच्या प्रेमाच्या चर्चा सुरू असतानाची ही घटना. झाले असे की, या चर्चा सुरू असतानाच प्रियंकाच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. 25 जानेवारी 2011 रोजी आयकर विभागाचे कर्मचारी प्रियंकाच्या घरी पोहोचले तेव्हा सकाळचे 7.30 वाजले होते. कर्मचाऱ्यांनी प्रियंकाच्या घराचा दरवाजा ठोठावला. ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यावेळी शाहिदने प्रियंकाच्या घराचा दरवाजा उघडला होता. शाहिद कपूर टॉवेलमध्ये होता. ही बातमी सगळीकडे पसरली आणि शाहिद व प्रियंकांच्या अफेअरच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले.
पुढे याबद्दल प्रियंकाने खुलासाही केला होता. आयकर विभागाची धाड पडली तेव्हा शाहिद कपूर माझ्या घरीच होता, अशी कबुली खुद्द प्रियंकाने दिली होती. शाहिद माझ्या घरापासून तीन मिनिटांच्या अंतरावर राहतो. त्यामुळे धाड पडली तेव्हा मी शाहिदला फोन केला आणि तो लगेच आला, असे ती म्हणाली होती.