पहिल्यांदाच शाहिद कपूरच्या छोट्या भावाचा फोटो आला समोर, आहे केवळ आठ महिन्यांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:39 PM2020-05-04T14:39:00+5:302020-05-04T14:40:02+5:30
शाहिद कपूरच्या या चिमुकल्या भावाचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि शाहिद कपूरचे सावत्र पिता राजेश खट्टर यांच्या घरी गेल्या वर्षी एका चिमुकल्याचे आगमन झाले. राजेशने अभिनेत्री वंदना सजनानीसह त्यांनी लग्न केले असून ऑगस्ट 2019 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. राजेश आणि वंदना यांच्या आयुष्यात आलेल्या या चिमुकल्यामुळे ते चांगलेच खूश आहेत. त्यांनी पहिल्यांदाच या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राजेश यांनी मुलासोबतचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हॅलो (माझा हा पहिलाच हॅलो असून मी पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत आहे) माझे पप्पा मला सांगत आहेत की, जगावर सध्या एक मोठे संकट आले आहे. पण या सगळ्यातून आपण लवकरच बाहेर पडणार आहोत... आम्ही हे जग अधिक सुंदर बनवणार आहोत. तुम्ही सगळे घरात राहत असल्याने सगळ्यांचे आभार... घरातच राहा आणि सुरक्षित राहा... आणि माझ्या मम्मी-पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... तुमच्या लग्नाला १२ वर्षं झाली असली तरी माझा जन्म झाल्यानंतर हा तुमचा पहिलाच लग्नाचा वाढदिवस असल्याने तो खूप खास आहे.
राजेश आणि वंदना यांच्या मुलाचे नाव वनराज कृष्णा असून तो केवळ आठ महिन्यांचा आहे. शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. शाहिद फक्त तीन वर्षांचा असताना पंकज कपूर आणि नीलिमा यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकसह लग्न केले आणि नीलिमा यांनी राजेश खट्टरसह लग्न केले. त्यानंतर या दोघांचाही घटस्फोट झाला. ईशान खट्टर हा शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे.