हेमाला टीव्हीवरच्या त्या तरूणाचं नाक आवडलं आणि तिला हिरो सापडला..., नाव Shahrukh Khan !!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 12:20 PM2021-11-02T12:20:11+5:302021-11-02T12:33:44+5:30
shahrukh khan birthday: होय, नाकामुळेच शाहरूखला त्याचा पहिला सिनेमा मिळाला होता. खुद्द एसआरकेने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shahrukh Khan birthday) याचा आज वाढदिवस. गेल्या काही दिवसांत कठीण प्रसंगातून जात असलेला शाहरूख आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करतोय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
‘फौजी’ या मालिकेद्वारे शाहरुखची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर शाहरूख सिनेमात आला आणि सिनेमाच्या दुनियेचा सुपरस्टार झाला. पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसावं की, शाहरूखला स्टार बनवण्यात त्याच्या नाकाचा मोठा वाटा होता. होय, नाकामुळेच शाहरूखला त्याचा पहिला सिनेमा मिळाला होता. खुद्द एसआरकेने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
शाहरूख टीव्हीवर काम करत असतानाची ही गोष्ट. तो एका लोकप्रिय मालिकेत काम करत होता. सिनेमात एन्ट्री करण्याचा इरादा होताच आणि दुसरीकडे हेमा मालिनीचा (Hema Malini) दिग्दर्शनात उतरण्याचा इरादा पक्का झाला होता. पण तिला तिच्या सिनेमासाठी हिरो मिळाला नव्हता. एकदिवस हेमा घरी आली आणि टीव्हीसमोर बसली. चॅनल बदलत असताना अचानक ‘फौजी’ मालिकेतील एका तरूणाच्या चेह-यावर तिची नजर स्थिरावली. तरूण फार देखणा नव्हता. पण त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. हेमाने लगेच त्याचं नाव, पत्ता शोधण्याचं फर्मान सोडलं आणि पाठोपाठ त्याचा फोननंबरही मिळाला. हेमाच्या बहिणीने ताबडतोब त्या तरूणाला फोन केला. पण हेमा मालिनीच्या ऑफिसमधून आपल्या कोण फोन करेल? कुणीतरी मस्करी करतोय, म्हणून त्याचा प्रतिसाद शून्य. त्याचा हा प्रतिसाद पाहून हेमाची बहिण चांगलीच वैतागली आणि तिने थेट हेमा मालिनीचा नंबर त्याला दिला. मग काय, दोनच दिवसांनी तो तरूण मुंबईच्या हेमाच्या घरी ऑडिशनसाठी पोहोचला. तो तरूण होता शाहरूख खान. हेमाला पाहताक्षणीच शाहरूख आवडला. सर्वाधिक आवडलं ते त्याचं नाक. होय, शाहरूखनं स्वत: मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
हेमानं शाहरूखला निरखून पाहिलं आणि आपल्या मेकअपमॅनला बोलवलं. त्यानं शाहरूखचे केस जेल लावून नीट बसवले आणि शाहरूख हेमाला पसंत पडला. ‘दिल आशना है’ (Dil Aashna Hai) या सिनेमासाठी शाहरूख फायनल झाला. यावेळी तुझं नाक सर्वांपेक्षा वेगळं आहे आणि याच नाकामुळे तुला ही संधी मिळालीये, असं हेमा शाहरूखला म्हणाली होती. तोपर्यंत स्वत: शाहरूखला त्याचं नाकं कधीच आवडलं नव्हतं. तो नेहमी त्याच्या मोठ्या नाकाला लपवण्याचा प्रयत्न करायचा. पण हेमाला त्याचं हेच नाक आवडलं होतं.
‘दिल आशना है’ हा शाहरूखने साईन केलेला पहिला सिनेमा होता. अर्थात त्याचा डेब्यू झाला तो ‘दिवाना’ या चित्रपटातून. जातीय दंगलीमुळे ‘दिल आशना है’ उशीरा रिलीज झाला. तो वेळेवर रिलीज झाला असता तर कदाचित याच चित्रपटातून शाहरूखचा डेब्यू झाला असता.