‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:49 PM2018-12-13T17:49:51+5:302018-12-13T17:57:27+5:30
श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आजही मिस करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 'झीरो' सिनेमा श्रीदेवी यांना दाखवू शकलो असतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठलीही नव्हती अशा शब्दांत शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलीवुडच्या चांदनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाचा धक्का पचवणं अजूनही अनेकांना कठीण जात आहे. त्या या जगात नाहीत ही कल्पनाच कुणाला सहन होत नाही. त्यातच श्रीदेवी यांचा रुपेरी पडद्यावरील अखेरचा परफॉर्मन्स किंग खानच्या आगामी झीरो सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात श्रीदेवी यांची छोटीशी झलक रसिकांना दिसेल. 'झीरो' सिनेमातील त्या परफर्मन्सचे चित्रीकरण झाल्यानंतर काही दिवसांतच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे साहजिकच झीरो सिनेमाच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर किंग खान शाहरुख भावुक झाला आहे.
श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आजही मिस करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. झीरो सिनेमा श्रीदेवी यांना दाखवू शकलो असतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठलीही नव्हती अशा शब्दांत शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सिनेमात श्रीदेवी यांची मोठी भूमिका नाही, मात्र त्यांची छोटीशी झलकही सिनेमाला खास बनवत आहे असंही शाहरूखने आवर्जून सांगितले. आज श्रीदेवी जिथे कुठे असतील त्यांना अतिशय आनंद होत असेल असंही त्याने म्हटले आहे.
करियरच्या सुरुवातीला आर्मी सिनेमात श्रीदेवी यांच्यासह काम केल्याची आठवणही यावेळी शाहरुखने सांगितली. तेव्हापासून त्यांच्यासोबत वेगळंच नातं निर्माण झालं होतं असंही त्याने नमूद केलं. काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये एका बड्या शाही लग्न सोहळ्यात आमीर, सलमानसह एकत्र होतो त्यावेळीही त्यांची खूप आठवण आली आणि त्या आपल्यासोबतच असल्याचे जाणवल्याचे त्यानं सांगितले.
कारण श्रीदेवी यांना अशाप्रसंगांमध्ये सहभागी व्हायला आवडत असे असंही शाहरुखने म्हटले आहे. श्रीदेवी यांच्या दोन्ही लेकींनी आपल्या आईप्रमाणे खूप मोठं व्हावं आणि नाव कमवावं अशी इच्छाही शाहरुखने व्यक्त केली आहे. एखादा सीन चित्रीत करताना तो अधिकाधिक चांगला कसा होईल याकडे श्रीदेवी यांचा आग्रह असायचा असंही त्याने सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झालं असून ती पोकळी भरून येणं शक्य नसल्याचे शाहरूखने म्हटले आहे.