आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 09:43 AM2024-12-12T09:43:30+5:302024-12-12T09:48:26+5:30
शाहरुखने 'मन्नत' बंगल्यात एक बदल करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी मागितली आहे.
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मुंबईतील आलिशान 'मन्नत' (Mannat) बंगल्याचं सर्वांनाच आकर्षण आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मन्नतबाहेर रोज चाहत्यांची गर्दी असते. अनेक जण मन्नत नेमप्लेटजवळ उभे राहून फोटोही काढतात. अनेक वर्षांपासून शाहरुख आपल्या कुटुंबासह या बंगल्यात राहत आहे. दरम्यान आता हा बंगला आणखी भव्य करण्याचा निर्णय शाहरुख आणि गौरी खानने घेतला आहे.
शाहरुख खान आणि गौरी मन्नत बंगल्याला आणखी आलिशान बनवण्याच्या तयारित आहेत. टाइम्स नाऊ रिपोर्टनुसार, शाहरुख आणि गौरीने गेल्या महिन्यात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी (MCZMA) कडे एक अधिकृत अर्ज केला आहे. यामध्ये मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले बनवण्याची परवानगी त्यांनी मागितली. MCZMA ने या अर्जावर नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये विचार केला. जर शाहरुखला याबाबतची परवानगी मिळाली तर यासाठी येणारा खर्च तब्बल २५ कोटी रुपये आहे.
मन्नत ही एक ऐतिहासिक संपत्ती आहे. १९१४ साली हा बंगला बांधला गेला होता. त्यामुळे यात कोणताही मोठा बदल करण्याआधी परवानगी घ्यावी लागते. मन्नत बंगला २०९१.३८ स्क्वेअर मीटरवर पसरला आहे. आधीच हा सहा मजली बंगला आहे आणि आता आणखी दोन मजले वाढवण्याची योजना आखली जात आहे.
शाहरुख खानने २००१ साली 'मन्नत' बंगला विकत घेतला होता. तेव्हा त्याने १३ कोटी रुपये किंमत मोजली होती. तेव्हा बंगल्याचं नाव विला विएना असं होतं. 'येस बॉस' सिनेमावेळीच हा बंगला शाहरुखच्या नजरेत आला होता. मन्नत खरेदी केल्यानंतर गौरीनेच त्याचं इंटिरियर डिझाईन केलं होतं. त्यांनी बंगल्याचं नाव बदलून मन्नत ठेवलं. आज याची किंमत तब्बल २०० कोटी आहे.