अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला होता कास्टिंग काऊचमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:36 PM2019-09-03T17:36:47+5:302019-09-03T17:37:37+5:30
या अभिनेत्याने आजवर 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शक्ती कपूरने एक खलनायक, विनोदी कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. त्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शक्ती कपूरचा आज म्हणजेच 3 सप्टेंबरला वाढदिवस असून त्याचा जन्म दिल्लीतील आहे. दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये त्याचे वडील टेलर शॉप चालवत होते. शक्तीचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर असून त्याने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला होता. सुनील दत्त यांच्या रॉकी या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांचा मुलगा संजय दत्तला लाँच केले. त्याच चित्रपटात सुनील दत्त यांनी शक्तीला संधी दिली आणि याच चित्रपटाच्यावेळी त्याला नाव बदलण्याविषयी देखील सुचवले. त्याआधी शक्तीने कुर्बानी या चित्रपटात काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता रॉकीमुळे मिळाली.
शक्ती कपूरने रॉकी या चित्रपटानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याने 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खलनायक म्हणून नावारूपाला आल्यानंतर शक्तीने अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारल्या. अंदाज अपना अपना, राजा बाबू, जुडवा यांसारख्या अनेक चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिका गाजल्या. शक्ती काही वर्षांपूर्वी कास्टिंग काऊच प्रकरणात देखील अडकला होता. 2005 मध्ये इंडिया टिव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शक्ती बॉलिवूडमध्ये करियर करण्यास इच्छुक असलेल्या मुलीकडे सेक्शुअल फेव्हर मागत असल्याचे दिसला होता. ही मुलगी त्याच वाहिनीची रिपोर्टर होती. छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. या घटनेनंतर फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ट ऑफ इंडियाने त्याच्यासोबत काम न करण्याचे ठरवले होते. पण काहीच दिवसांत ही बंदी मागे घेण्यात आली होती. शक्तीने त्यावेळी दावा केला होता की, या रिपोर्टरने आत्महत्येची धमकी दिल्यामुळेच मी तिने बुक केलेल्या हॉटले रूममध्ये गेलो होतो. या प्रकरणात उगाचच मला गोवण्यात आले असल्याचे त्याने म्हटले होते.
शक्ती कपूरने काही वर्षांपूर्वी पूनम पांडेसोबत एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात शक्ती आणि पूनमवर चित्रीत झालेल्या बोल्ड सीनची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.