शाल्मली टोळ्येने जागवल्या ‘मैं हू ना’च्या आठवणी
By Admin | Published: November 16, 2016 03:44 AM2016-11-16T03:44:21+5:302016-11-16T03:44:21+5:30
मैं हूँ ना हा चित्रपट आपल्यातील अनेकांनी कित्येक वेळा पाहिला असेल. पण या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
मैं हूँ ना हा चित्रपट आपल्यातील अनेकांनी कित्येक वेळा पाहिला असेल. पण या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हो, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये या चित्रपटात होती. शाल्मलीला आणि तिच्या बहिणीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सोनू निगम, ए.आर. रहमान यांच्यासोबत स्टेज शो केले आहेत. तसेच मैं हू ना या चित्रपटातही ती झळकली आहे. या चित्रपटाच्या आठवणींविषयी शाल्मली सांगते, ‘‘या चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिलिंगला होते. नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीत आम्ही तिथे चित्रीकरण करत होतो. थंडीत तिथे अंधार लवकर होतो. त्यामुळे संध्याकाळी चारच्या आत पॅकअप व्हायचे आणि चित्रीकरण सकाळी सहालाच सुरू व्हायचे. त्या थंडीत सकाळी चारला अंघोळ करताना आमची अवस्था अतिशय वाईट व्हायची. पाणी कितीही गरम असले तरी ते क्षणात थंड व्हायचे. आम्ही सगळ्या मुली अंघोळ करताना अक्षरश: किंचाळायाचो. फरहा खान सगळ्या टीमची खूप काळजी घेत असे. आमची टीम एखाद्या कुटुंबासारखी होती. दर शुक्रवारी एक ते सव्वा तासाचा एक कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमात आम्ही नाचायचो, नाटक सादर करायचो आणि ते पाहाण्यासाठी फरहा खान, शाहरुख खान, सुश्मिता सेन यायचे. माझे एक नृत्य तर शाहरुखला इतके आवडले, की त्याने स्टेजवर येऊन माझ्या कपाळावर किस केले होते. माझ्या आयुष्यातील हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. फरहा खान तर मला आणि माझ्या एक मैत्रिणीला गिगलिंग गर्ल्स असे म्हणायची. मी कॉलेजमध्ये एकांकिकांमध्ये काम केले असल्याने मला अभिनयाची जाण होती. त्यामुळे अनेक दृश्यांत तिने माझ्याकडून अभिनयदेखील करून घेतला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत मैत्री कोण करणार, असे बोमन इराणी विचारतात आणि त्यानंतर अमृता मैत्री करेल असे म्हणत तिच्याकडे बोट दाखवतात, असे एक दृश्य आहे. त्या दृश्यात मी अमृताच्या बाजूलाच बसले होते.