करिअरमध्ये पहिल्यांदाच शरद केळकर साकारणार या सिनेमात अशी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:17 PM2018-10-23T15:17:48+5:302018-10-23T15:19:04+5:30
शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
‘माधुरी’ मधील शरद केळकरच्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेविषयी बोलताना निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “शरदने जे पात्रं साकारलं आहे त्या पात्राविषयी मी फार विचार केला की मी यासाठी कोणाला कास्ट करु शकतो. कारण हे पात्र प्रेमळ, हँडसम आणि हॉट आहे. शरदची आणि माझी खुप जुनी ओळख आहे. शरदचं काम मी पाहिलंय आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचा अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणि ‘माधुरी’ मध्ये शरदने अप्रतिम काम केलंय आणि मुळात, प्रेक्षकांना त्याने या कधी नं साकारलेलं पात्रं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील शरदचे काम पाहिल्यावर मला खात्री आहे की शरद मराठी सिनेमामध्ये एक छाप सोडेल इतका त्याचा अभिनय अप्रतिम आहे”. निर्माते मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ चित्रपटातील शरदची आगळी-वेगळी भूमिका येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सोनाली आणि शरद यांच्यासोबतीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. निर्माते मोहसिन अख्तर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटातून एका नव्या चेह-याला त्याचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची संधी दिली आहे आणि तो नवा चेहरा म्हणजे संहिता जोशी. विशेष म्हणजे या चित्रपटातील आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी संहिताची निवड करण्यात आली.