शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:25 PM2024-11-15T18:25:31+5:302024-11-15T18:26:34+5:30
Shashank Ketkar And Mrunal Dusanis : शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत.
छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका पाहायला मिळतात. मालिका काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि निरोप घेतात. काही मालिका आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून राहतात. त्या कलाकारांना आणि मालिकांना प्रेक्षक मिस करत असतात. अशीच कलर्स मराठीवर गाजलेली मालिका म्हणजे सुखांच्या सरींनी हे मन बावरे (Sukhanchya Sarini He Man Baware). या मालिकेतील शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) या जोडीला आजही प्रेक्षक मिस करतात. या मालिकेत शशांकने सिद्धार्थची तर मृणालने अनूची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे.
होय. हे खरंय. सुखांच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका पुन्हा एकदा प्रसारीत होत आहे. कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यांनी मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार, सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार! नक्की बघा, सुखाच्या सरींनी हे मन बावरे १८ नोव्हेंबरपासून दुपारी १ वा. फक्त कलर्स मराठीवर...
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मालिकेची पोस्ट पाहून प्रेक्षकवर्ग खूप खूश झाला आहे आणि ही मालिका पुन्हा पाहायला मिळणार याचा आनंद व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, कायमची माझी आवडती मालिका आणि आवडते कलाकार. दुसऱ्या युजरने लिहिले की, प्राईमटाईममधील तुमच्या मालिका पाहण्यापेक्षा ही मालिका पाहणे रंजक असेल. आणखी एका युजरने लिहिले की, कायमचे आवडते अनू आणि सिद्धार्थ.
'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका २०१८ साली प्रसारीत झाली होती आणि २०२२ साली निरोप घेतला होता. या मालिकेनंतरच अभिनेत्री मृणाल दुसानिसने सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. तिनेदेखील आता कमबॅक केले असून स्टार प्रवाहवरील एका मालिकेत ती काम करताना दिसणार आहे.