"शत्रू होई परास्त,असा ज्याचा गनिमी कावा...", 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:08 PM2023-09-25T14:08:46+5:302023-09-25T14:09:12+5:30
Digpal Lanjekar : दिग्पाल लांजेकर यांनी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे.
‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि 'मल्हार पिक्चर कंपनी' यांनी ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छावा चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, उजळला तेजाने, पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा. शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा शिवशंभूचा अवतार जणू, अवतरला ‘शिवरायांचा छावा’. छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा,’१६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
'शिवरायांचा छावा' या सिनेमामध्ये मराठ्यांचे धैर्यवान राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या किशोरवयात दाखवलेले धाडस आणि शौर्य आणि त्यापुढील त्यांच्या आयुष्यात झालेले बदल मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझे परमभाग्यच आहे असे मी मानतो”, या शब्दांत लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
१६ फेब्रुवारीला ‘शिवरायांचा छावा’ येणार भेटीला
निर्माते वैभव भोर आणि किशोर पाटकर निर्मित ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे सहयोगी निर्माते भावेश रजनीकांत पंचमतिया हे आहेत तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रखर मोदी यांनी पेलली आहे. ‘मल्हार पिक्चर कंपनी’ बॅनरच्या अंतर्गत तयार होणाऱ्या ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून हा सिनेमा पुढील वर्षी १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.