मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' ९०च्या दशकातील अभिनेत्री, आता तिला ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 02:11 PM2020-12-07T14:11:22+5:302020-12-07T14:12:57+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री २९ दिवस होती कोमात, आता आहे बॉलिवूडमधून गायब
नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपट आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय यांना नुकताच ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. आशिकी चित्रपट राहुल रॉय यांच्यासोबत मुख्य भूमिकेत अनु अग्रवाल होती. अनु अग्रवाल एका अपघातानंतर कित्येक दिवसांपर्यंत कोमामध्ये होती.
११ जानेवारी, १९६९ साली दिल्लीत जन्मलेली अनु अग्रवालने मॉडेलिंगमधून करियरला सुरूवात केली होती. तिला आशिकी आणि खलनायक सारख्या चित्रपटांशिवाय इतर कोणत्याच चित्रपटातून यश मिळाले नाही. १९९९ साली तिच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. तिचे भयानक अपघात झाला आणि त्यानंतर ती कित्येक दिवसांपर्यंत कोमामध्ये होती. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेली होती. २९ दिवस कोमात राहिलेल्या अनु अग्रवालने १९९६नंतर कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. ती योग आणि अध्यात्माकडे वळली. तीन वर्षे उपचारानंतर तिची स्मरणशक्ती परत आली.
ग्लॅमर जगतापासून दूर आता अनु अग्रवाल या भयानक घटनेनंतर आता झोपडपट्ट्यांमधील गरीब मुलांना मोफत योगा शिकविते. अनु अग्रवाल शेवटची एप्रिल २०१८मध्ये महेश भट यांचे प्रोडक्शन हाउस विशेष फिल्म्सच्या तिसाव्या अॅनिव्हर्सरी पार्टीमध्ये पहायला मिळाली होती.
सध्या अनु अग्रवाल एक फाउंडेशन चालवते आहे. ज्याचे नाव अनु अग्रवाल आहे. या अंतर्गत ती मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत योगा शिकवते.
अनु अग्रवालच्या सिनेमातील कारकीर्दीबद्दल सांगायचं तर वयाच्या २१व्या वर्षी तिला सिनेइंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. अभ्यासादरम्यान महेश भट यांनी त्यांच्या आशिकी चित्रपटात तिला पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटातून ती एका रात्रीत स्टार झाली.
या चित्रपटाशिवाय ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, जन्म कुंडली आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ या चित्रपटात काम केले. हिंदी शिवाय तिने तमीळमधील ‘थिरुदा-थिरुदा’ चित्रपट आणि ‘द क्लाऊड डोर’ या लघुपटात काम केले.