'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 05:14 PM2018-10-13T17:14:06+5:302018-10-13T17:19:36+5:30

गौरी पिक्चर्स प्रोडक्शन व महेश मांजरेकर मूव्हीजचा 'मी शिवाजी पार्क' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

'Shivaji Park' soon to meet the audience | 'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्दे 'मी शिवाजी पार्क' चित्रपटात पाच ज्येष्ठ नागरिकांची कथा'मी शिवाजी पार्क' चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

समाजातल्या अनेक गोष्टीचे प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजी पार्क' या चित्रपटाची कथा गुंफली आहे. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन व महेश मांजरेकर मूव्हीजचा 'मी शिवाजी पार्क' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

'न्यायदेवता आंधळी असते... आम्ही डोळस होतो' ही टॅगलाईन असलेल्या 'मी शिवाजी पार्क' या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय  मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. 
चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने दोन गाणी चित्रपटात आहेत. गीतकार वैभव जोशी, श्रीरंग गोडबोले, यांच्या लेखणीतून ही गीते साकारली असून संगीतकार अजित परब यांचा सुरेल संगीत साज या गीतांना लाभला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
विक्रम गोखले,  सतीश आळेकर,  अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

Web Title: 'Shivaji Park' soon to meet the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.