शिवानीचा एल्गार

By Admin | Published: March 20, 2017 01:45 AM2017-03-20T01:45:22+5:302017-03-20T01:45:22+5:30

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रत्येक जण आपापली मतं मांडत असतो. व्यक्त होत असतो. आता तर व्यक्त होण्यासाठी सोशल नेटवर्किंग

Shivani's Elgar | शिवानीचा एल्गार

शिवानीचा एल्गार

googlenewsNext

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रत्येक जण आपापली मतं मांडत असतो. व्यक्त होत असतो. आता तर व्यक्त होण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटसारखं माध्यम आहे. मात्र, याच माध्यमातून बऱ्याचदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक तर होत नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. सोशल नेटवर्किंग साईटवर कुणीही कोणाबाबतही वाट्टेल ते कमेंट करीत असल्याचे पाहायला मिळते. काही जण त्या कमेंटला उत्तर देतात, तर काही जण कमेंट डिलीट करून विषय टाळणं सोयीचं समजतात. असाच एक मुद्दा काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने चर्चेत आणला. हा मुद्दा म्हणजे बॉडी शेमिंगचा. अभिनयच्या क्षेत्रात वावरत असल्याने शिवानी सोशल मीडियावरही तितकीच अ‍ॅक्टिव्ह असते. फॅन्ससोबत संवाद साधता यावा, त्यांच्याशी कनेक्ट होता यावं, यासाठी तिने आपलं अकाउंट्स प्रायव्हेट ठेवलं नाही. तिला कुणीही सहज फॉलो करू शकतं. मात्र, याचाच गैरफायदा काही जण सोशल मीडियावर घेत असल्याचं शिवानीच्या लक्षात आलं. बारीक हो, पोट झाक, अशा अनेक कमेंट्स तिच्याबाबत सोशल मीडियावरील तिच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या शिवानीनं बॉडी शेमिंगविरोधात आवाज उठविला. 'शेव्ह युअर ओपिनियन' हा हॅशटॅग वापरून इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो टाकला. एक प्रकारे त्यातून बॉडी शेमिंगविरुद्ध शिवानीने स्वत:ची भूमिका मांडली. यावरही आक्षेपार्ह कमेंट्स आल्या. मात्र, शिवानीने त्या डिलीट केल्या नाहीत. या सगळ्या कॅम्पेनमध्ये तिला तिच्या मित्रांची साथ लाभली. त्यांच्या प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे बळ दिल्याचे शिवानीने सांगितले. सोशल मीडियावर फोटोवर कुणी वाईट किंवा अश्लील कमेंट टाकली, की ती सामान्यपणे डिलीट केली जाते. विशेष म्हणजे, मुलींबाबत अशा गोष्टी जास्त घडतात. मात्र, त्यांनाही शिवानीने एक संदेश दिला आहे. ती सांगते, कमेंट का डिलीट करायच्या? त्या तशाच राहू द्या. कारण त्यातून कमेंट देणाऱ्याची विकृत मानसिकता दिसते. ती कमेंट डिलीट केल्याने असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे कमेंट डिलीट करू नका, असे शिवानीने सांगितले आहे.

Web Title: Shivani's Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.