Shraddha Murder Case: क्राइम पेट्रोलमध्ये श्रद्धा मर्डर केस; लोक भडकले, हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 05:19 PM2023-01-01T17:19:19+5:302023-01-01T17:19:47+5:30
Shraddha Murder Case: क्राइम पेट्रोल शो मध्ये आरोपी तरुणाला हिंदू तर तरुणीला ख्रिश्चन दाखवण्यात आले आहे.
Shraddha Murder Case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनावालावर श्रद्धाच्या हत्येचा आरोप आहे. आरोपीने श्रद्धाचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांचा तपास अद्याप सुरुच आहे. दरम्यान, सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोल शोमध्ये 'अहमदाबाद-पुणे मर्डर' नावाचा एपिसोड प्रसारित झाला आहे. हे आफताब आणि श्रद्धाच्या कथेचे नाट्यमय रुपांतर असल्याचा दावा केला जातोय. हा भाग प्रसारित केल्यानंतर शो वादात सापडला असून, #BOYCOTTSonyTV ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
शोच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या
प्रसारित भागांच्या अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. शोमध्ये श्रद्धा आणि आफताबचा धर्म बदलण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. श्रद्धा ही अॅना फर्नांडिस या ख्रिश्चन मुलीच्या भूमिकेत आहे, तर तिला मारणारा आफताब मिहिर नावाचा हिंदू तरुण दाखवला आहे. तसेच तो व्यवसायाने योगा शिक्षक दाखवण्यात आला आहे. एपिसोडमध्ये मिहिरची आई एक धार्मिक स्त्री आहे, जी मंदिरात जाऊन पूजा करते. नंतर, मिहीर आणि अॅना एका मंदिरात लग्न करतात आणि पुण्याला शिफ्ट होतात. तर श्रद्धा आणि आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते.
खून, शरीराचे अवयव आणि फ्रीजचे कनेक्शन
एपिसोडमध्ये दाखवण्यात आले आहे की, लग्नानंतर मिहीर अॅनाशी भांडू लागतो. एके दिवशी भांडण झाल्यावर मिहिर अॅनाला मारतो, तो अॅनाचा मृतदेह बाथरूममध्ये घेऊन जातो आणि धारदार शस्त्राने तिचे तुकडे करुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. मृत शरीराचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमधून मिहीर पाणी काढतो आणि त्याला काही फरक पडत नसल्याप्रमाणे पितो. असाच प्रकार श्रद्धाच्या बाबतीतही झाला आहे. त्यामुळे शोवर लोक नाराज झालेत.
बहिष्काराची मागणी
क्राईम पेट्रोलचा हा एपिसोड 27 डिसेंबरला दाखवण्यात आला होता. शोचा हा भाग 'अहमदाबाद-पुणे मर्डर' या नावाने प्रसारित झाला. या शोमध्ये हिंदू धर्माला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्विटरवरील यूजर्सचे म्हणणे आहे. ते वाहिनीवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
काय श्रद्धा-आफताब प्रकरण?
आफताब पूनावाला नावाच्या तरुणाने 18 मे 2022 रोजी त्याची 27 वर्षांची गर्लफ्रेंड श्रद्धा हिची हत्या केली. त्याने मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून घरात उदबत्तीचा वापर केला. यानंतर दररोज दो एक अवयव घेऊन दूर जंगलात फेकून देऊ लागला. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना त्याने अनेक वेबसिरीज आणि गुन्हेगारी चित्रपटांमधून घेतली. आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर भांडण वाढले. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. यामुळेच तिचा खून केला.