"साडी नेसून सिगरेट...", श्वेता तिवारीला मिळाली बड्या निर्मात्याच्या सीरिजची ऑफर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:04 PM2024-07-25T16:04:10+5:302024-07-25T16:04:48+5:30
आज वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ती कायमच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
'कसौटी जिंदगी की' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari). २३ वर्षांपूर्वी ही मालिका आली होती. श्वेता तिवारीने यामध्ये प्रेरणा ही मुख्य भूमिका साकारली होती. आज वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ती कायमच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन घटस्फोट, २३ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा असं तिचं आयुष्य आहे. दुसरीकडे श्वेता तिवारी लवकरच एका बड्या निर्मात्याच्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
टीव्हीवर साध्या सरळ सूनेची भूमिका केल्यानंतर श्वेता तिवारी आता सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' मध्ये झळकली होती. यानंतर ती रोहितच्याच 'सिंघम अगेन' मध्येही आहे. मात्र आता news 18 च्या रिपोर्टनुसार, श्वेता तिवारीची करण जोहरच्या सीरिजमध्येही वर्णी लागली आहे. श्वेता म्हणाली, "मी धर्मा प्रोडक्शनच्या वेबसीरिजमध्ये काम करत आहे. त्यात माझी डॉनसारखी भूमिका आहे जी साडी नेसते आणि सिगरेट ओढते. ही माझ्यासाठी खूप आव्हानात्मक भूमिका होती म्हणून मी होकार दिला."
ती पुढे म्हणाली, "तुम्हाला जे आवडतं ते करा. मी आतापर्यंत टेलिव्हिजनचा चेहरा होते. पण आता मी त्या साच्यातून बाहेर येत आहे. यासाठी मला छोट्या भूमिकाही स्वीकाराव्या लागतील याची मला पूर्ण कल्पना आहे. दर पाच वर्षात मला वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन सुरुवात करायची आहे."
आयुष्यात संतुष्ट आहे
श्वेता तिवारी सध्या तिच्या आयुष्यात संतुष्ट आहे. मग ते वैयक्तिक असो किंवा प्रोफेशनल. जे तिला आवडतं ते ती करते. प्रोजेक्ट चांगला असेल तर ती पैसे पाहत नाही फक्त करते. चांगलं काम करण्याची भूक आजही आहे. अनेकदा निर्मात्यांकडे खर्च करण्याची ताकद नसेल तर ती एकही मानधन न घेताही काम करते.