सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:39 PM2024-06-14T12:39:52+5:302024-06-14T12:40:21+5:30
"त्यांनी मला फोन करून...", सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने सिद्धार्थवर चिडले होते राज ठाकरे
मराठी कलाकार अनेकदा एकमेकांना टोपणनावाने हाक मारताना दिसतात. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कलाकारांना खडे बोल सुनावले होते. यावरुन मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचे देखील राज ठाकरेंनी कान टोचले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने हा किस्सा सांगतिला आहे.
सिद्धार्थने नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राज ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. सिद्धार्थने त्याच्या एका लेखात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उल्लेख "तेंडल्या" असा केला होता. त्यावरुन राज ठाकरेंनी फोन करत सिद्धार्थची कानउघाडणी केली होती. सिद्धार्थने हा किस्सा शेअर केला आहे. सिद्धार्थ म्हणाला, "२०१८ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये मी वर्ल्ड कपवर राइट अप लिहायचो. ते लेख मी माझ्या भाषेत लिहायचो. त्यामध्ये मी आज धोनी तर सॉलिड खेळला आणि तेंडल्या आज सेंच्युरी मारणारच...असं लिहायचो. तर एक दिवशी मला राज ठाकरेंचा फोन आला. हॅलो सिद्धार्थ जाधव, राज ठाकरे बोलतोय".
"मी कधी तुम्हाला सिद्धू, सिद्ध्या अशी हाक मारलीये का? असं त्यांनी विचारलं. मी म्हटलं की नाही सर. त्यावर ते म्हणाले की सचिन तेंडुलकरला तुम्ही तेंडल्या म्हणता हे योग्य आहे का? आपण आदर करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला कधीच सिद्धू नाही म्हणणार. मला हे एवढं आवडलं की...तसं सिद्धार्थ जाधव त्यांच्या लेखी फक्त एक अभिनेता आहे. पण, त्यांनी तसं त्या कलाकाराला फोन करून सांगणं. त्यांची विचारसरणी, त्यांचं थिंकिंग हे सगळं खूप कमाल आहे. ते मराठी माणसाचा, मराठी कलाकारांचा विचार करतात," असंही पुढे सिद्धार्थ म्हणाला.
सिद्धार्थ जाधव हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या सिद्धार्थने मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच सिद्धार्थने बॉलिवूडमध्येही त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'सर्कस', 'सूर्यवंशी', 'सिंबा' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.