Sidhu Moose Wala Murder Case: भारत-पाक बॉर्डरजवळ सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांचा पंजाब पोलिसांनी केला 'एन्काऊंटर'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 07:37 PM2022-07-20T19:37:04+5:302022-07-20T19:38:00+5:30
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर तब्बल ५३ दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई केली. सिद्धू मूसेवालावर गोळीबार करणाऱ्या आणि हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या दोघांचा पंजाब पोलिसांनी अटारी बॉर्डरवर खात्मा केला.
Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोन गुंडांचा पंजाबपोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. बुधवारी सकाळपासून अमृतसरमध्ये दोन्ही गुन्हेगारांशी पोलिसांची चकमक सुरू होती. काही तासांनंतर संध्याकाळी ही चकमक संपली. अटारी सीमेजवळील होशियार नगर गावात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे दोन गुंड ठार झाले.
काही दिवसांपूर्वी CCTV फुटेज झालं होतं व्हायरल
पोलिसांनी सांगितले की, आजच्या चकमकीत सामील असलेले मनप्रीत सिंग उर्फ मन्नू कुसा आणि जगरूप सिंग रूपा नावाचे दोन गुंड हे मूसेवालाची हत्या करणारे शूटर होते. त्याची हत्या केल्याच्या दिवसापासून हे दोघे फरार होते. २१ जून रोजी मोगा जिल्ह्यातील समलसर येथे दोघेही दुचाकीवरून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.
चकमकीत पत्रकाराला दुखापत
आरोपी ज्या ठिकाणी लपले होते तिथून बंदुकीच्या फायरिंगचा आवाज ऐकू आला. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती आणि स्थानिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले होते. गुंडांच्या गोळीबारात एका खासगी माध्यम वाहिनीचा व्हिडिओ पत्रकार जखमी झाला. तसेच तीन पोलीस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले.
AK-47 रायफलमधून गोळीबार
चकमक संपल्यानंतर, अँटी-गँगस्टर टास्क फोर्स (AGTF) चे असिस्टंट डीजीपी प्रमोद बन यांनी सांगितले की, मन्नू आणि रूपा, ज्या गुंडांनी मुसेवालावर गोळ्या झाल्या ते दोघेही चकमकीत मारले गेले. दोघेही शार्प शूटर होते. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने गुंडांकडून एक एके-47 आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. ते लपून बसलेल्या घरातून एक AK-47 रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले. एक बॅगही जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीनंतर उघडली जाणार आहे.
२९ मे रोजी झाली होती मूसेवालाची हत्या
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येच्या एक दिवस आधी राज्य सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला आपला चुलत भाऊ आणि मित्रासह महिंद्रा थार जीपमधून घरातून निघाला होता. २८ वर्षीय मुसेवालाने अलीकडेच काँग्रेसच्या तिकिटावर मानसा मधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आप नेते विजय सिंगला यांच्याकडून त्याचा पराभव झाला होता.