सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला बाळाला जन्म, वडिलांनी शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 09:22 AM2024-03-17T09:22:35+5:302024-03-17T09:23:16+5:30
सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी ५८व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे.
दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. चरण कौर यांनी ५८व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईवडिलांना पुन्हा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. सिद्धूच्या वडिलांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन बाळाचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन बाळाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते बाळाला घेऊन बसल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धू मुसेवालाचा फोटो आहे. "सिद्धूवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या आशीर्वादाने त्याच्या छोट्या भावाचा जन्म झाला आहे. वाहेगुरूंच्या आशीर्वादाने दोघेही सुखरुप आहेत. हितचिंतकांचे आभार," असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून २९ मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. एकलुता एक मुलाच्या हत्येनंतर त्यांनी आयव्हीएफ(IVF)च्या माध्यमातून पुन्हा आईवडील होण्याचा निर्णय घेतला होता. या वयात आई होणार असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच सिद्धू मुसेवालाच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.