दिलीप कुमारांचा साधेपणा नागपूरकरांच्या स्मरणात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:22 AM2021-07-08T09:22:31+5:302021-07-08T09:23:05+5:30
नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
नागपूर: चित्रपटसृष्टीचे बेताज बादशाह दिलीप कुमार यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली. त्यातील बहुतेक भेटीदरम्यान या महान कलावंताच्या साधेपणाने नागपूरकरांवर भुरळ पाडली, जी आजही कायम आहे. साई मंदिराच्या कार्यक्रमासह देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी नागपूरला येणे कायमच सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एनकेपी साळवे यांनी त्यांना आणले होते. त्यांच्या वागण्या-बाेलण्यात कुठलाही आव नव्हता. आम्ही कलावंतांनी कार्यक्रमात गझल सादर केल्या तेव्हा त्यांनीही कलावंतांची भरपूर प्रशंसा केली, अशी आठवण कादरभाई यांनी सांगितली.
मुंबईपासून विजय दर्डा यांची साेबत -
१९९८ला लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कार्यक्रमासाठी दिलीप कुमार नागपूरला आले होते. त्यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार आणि तत्कालीन इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनीच त्यांना विमानाने मुंबईहून नागपूरला आणले होते. नागपूर विमानतळावर लोकमत प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली. आजही काँग्रेस पक्षाकडून मोठ्या आशा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाशी जुळलेल्या दिलीप कुमार यांनी राजकीय अनुभव सांगितले हाेते.