बंदीनंतर मीका सिंगची क्षमायाचना; म्हणे, मी देशाची माफी मागण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:36 PM2019-08-19T15:36:27+5:302019-08-19T15:37:03+5:30
मीका सिंगला पाकिस्तानात जाऊन परफॉर्म करणे महागात पडले. भारतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली. सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या मीकाने आता माफी मागितली आहे.
मीका सिंगला पाकिस्तानात जाऊन परफॉर्म करणे महागात पडले. भारतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली. सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या मीकाने आता माफी मागितली आहे. नुकतेच मीकाने द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेम एम्प्लॉईजला (FWICE) पत्र लिहित क्षमायाचना केली.
बंदीची कारवाई करण्यापूर्वी मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे मीकाने या पत्रात म्हटले आहे. मीकाने FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिवारी मीकाचे पत्र मिळाल्याचे सांगत आहेत. या पत्रानंतर FWICE ने मीकाला चर्चेसाठी बोलवले आहे.
I would like to sincerely thank Mr. BN Tiwari and #FWICE for being so understanding towards me and my sentiments. As I always have done, I will continue to do good for my society and the people of my Country. JaiHind 🙏🏻.. #Supportindiansingers#Banpaksitanisingers ... pic.twitter.com/Zsj3uHi2uU
— King Mika Singh (@MikaSingh) August 18, 2019
मीका म्हणतो,
मी काही चुकीचे केले असेल तर मी देशाची माफी मागायला तयार आहे. पण कृपया माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय माझ्यावर कुठल्याही प्रकारची बंदी लादली जाऊ नये, असे मीकाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय कलाकारांवरही बंदी घातली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मीका सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मीका सिंह कराची येथे परफॉर्मन्स देताना दिसून आला होता. जनरल मुशर्रफच्या नातेवाईकाच्या एका विशेष कार्यक्रमात मीकाने परफॉर्मन्स दिला होता. या घटनेचे पडसाद भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये उमटले होते.
‘काश्मीर अजूनही बंद आहे, अशा परिस्थितीत एक भारतीय गायक इथे येतो, परफॉर्मन्स देतो, पैसे कमावतो आणि निघून जातो. असे वागतो जाणून काही घडलेच नाही. यावरून लक्षात येते की, धर्म आणि देशप्रेम हे केवळ गरिबांसाठी आहे’, अशा प्रकारे ट्विट करत पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्याहोत्या. पाकिस्तानी सरकारने या काळात एकूण 14 लोकांचा व्हिसा मंजूर केला होता. यामध्ये मीका सिंह याचे नाव होते.
या प्रकरणानंतर मीका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मीकावर बंदी लादली होती. यापश्चात द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेम एम्प्लॉईजनेही (FWICE) मीका सिंग व त्याच्यासोबतच्या 14 क्रूमेंबर्सवर बंदी घातली होतीे. त्यानुसार, मीकावर भारतात कुठल्याही प्रकारचा परफॉर्मन्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक सिंगींग आणि अॅक्टिंग करण्यावर बंदी आहे.