माझ्या प्रेमाला वाईट नजरेने बघत असाल तर..; फॅनला किस करण्याबाबत उदित नारायण स्पष्टच बोलले; म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:38 IST2025-02-02T18:38:15+5:302025-02-02T18:38:49+5:30
उदित नारायण यांनी नुकत्याच एका मुलाखतीत फिमेल फॅनला किस केल्याच्या प्रकरणावरुन त्यांची प्रतिक्रिया दिलीय. त्यांना कोणताच पश्चाताप नाही असंही त्यांनी सांगितलंय (udit narayan)

माझ्या प्रेमाला वाईट नजरेने बघत असाल तर..; फॅनला किस करण्याबाबत उदित नारायण स्पष्टच बोलले; म्हणाले-
सध्या उदित नारायण (udit narayan) प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. शुक्रवारी (३१ जानेवारी) झालेल्या एका लाइव्ह शोदरम्यान उदित नारायण यांनी त्यांना भेटायला आलेल्या चाहतीला सर्वांसमोर किस केलं. त्यामुळे विविध स्तरांमधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. पण या घटनेचा उदित नारायण यांना कोणताच पश्चाताप नाही असं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत म्हटलंय. उदित नारायण काय म्हणाले जाणून घ्या. (udit narayan kiss controversy)
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण म्हणाले की, "मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला, माझ्या देशाला लाज वाटेल अशी कोणती गोष्ट आजवर केलीय? आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा मी सर्व काही मिळवलंय, त्यावेळी मी असं लाज वाटणारं कृत्य का करेल? माझे चाहते आणि माझ्यात एक खोल, अतूट, प्रेमळ नातं आहे. तुम्ही व्हिडीओत जे पाहताय त्यात माझ्या फॅन्ससोबत असलेलं प्रेम दिसतंय. ते माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे मी त्यांच्यावर आणखी जास्त प्रेम करतो."
"मला कोणताही पश्चाताप नाही. मला पश्चाताप का असावा? माझ्या आवाजात तुम्हाला कोणता पश्चाताप अथवा दुःख ऐकायला मिळतंय? मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळी खरंतर मला हसू येतंय. ही कोणती खाजगी किंवा वाईट गोष्ट नाही. माझं मन एकदम साफ आहे. जर लोक माझ्या प्रेमाला वाईट नजरेने बघत असतील तर मला खूप दुःख आहे. मी अशा लोकांना धन्यवाद देईल कारण आधीपेक्षा जास्त लोकप्रिय त्यांनी मला आता केलंय."
उदित यांना भारतरत्न मिळवण्याची इच्छा
उदित नारायण शेवटी म्हणतात, "मला आजवर फिल्मफेअर, राष्ट्रीय, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. मला आता लता मंगेशकर यांच्यासारखा भारतरत्न मिळवायची इच्छा आहे. माझ्या पिढीतील गायकांमध्ये मी सर्वांचा आवडता गायक आहे हे तुम्हाला माहितीये का? माझ्या पिढीतील गायकांमध्ये सर्वाधिक गाणी मी गायली आहेत. माझ्याकडे सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे इतर अयशस्वी होताना आनंद मानणाऱ्या लोकांची पर्वा मी का करु?"