एकपात्री नारी, घेईल भरारी!
By Admin | Published: September 21, 2015 02:53 AM2015-09-21T02:53:52+5:302015-09-21T02:53:52+5:30
पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. ‘वन वूमन शो’तून स्वत:ला सिद्ध करीत आहेत
पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. ‘वन वूमन शो’तून स्वत:ला सिद्ध करीत आहेत. विविध प्रयोगांच्या निमित्ताने त्यांना परगावी, परराज्यात, परदेशातही जाण्याची संधी मिळते. अशा वेळी धाडस, आत्मविश्वास, क्षमता, कौशल्य आणि दर्जा यांच्या सोबतीने त्या स्वत:चा ठसा उमटवतात. त्यांनी नव्या कलाकारांसाठी आदर्श निर्माण करून दिला आहे.
साठच्या दशकात एकपात्री नाटकाचा जन्म झाला. महिलांना एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने नानाविध अनुभव येतात. एकपात्री कला परिषदेच्या अध्यक्षा चैत्राली माजगावकर म्हणाल्या, की या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे खंबीरपणा, धाडस आणि कलेवर प्रेम असणारी महिलाच यात पाय रोवून उभी राहू शकते. विनोद, कविता, शायरी एकत्र करून सादर केले म्हणजे एकपात्री सादर केले, असे नाही. त्यासाठी साहित्याचा अभ्यास, लेखनाचे कौशल्य, सकस संहिता निर्माण करण्याची क्षमता असावी लागते, तरच टिकाव लागतो. थोेडा नि:संकोचपणा वागण्यात आणावा लागतो.
‘चर्पट मंजिरी’फेम मंजिरी धामणकर यांनी ‘समाधानकारक धन मिळाले नाही तरी मान मात्र मिळतो,’ असे सांगितले. प्रसंगानुरूप बदल करून प्रसंगावधान राखावे लागते. तिने जिद्दीने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात स्वत:ची तब्येत सांभाळली पाहिजे, असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला.
‘हास्यवर्षा’, ‘क कवितेचा’ हे कार्यक्रम करणाऱ्या डॉ. मृण्मयी भजक म्हणाल्या, की महिलांना विनोदातलं काय कळतं, हा समज लोकांच्या मनात अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. त्यामुळे एकटी महिला हजारो प्रेक्षकांसमोर काय सादरीकरण करणार, असे भाव सतत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. अशा वेळी प्रेक्षकवर्ग पाहून बदल करावे लागतात.
‘अस्सा नवरा’, ‘एक दिवस असाही’फेम कल्पना देशपांडे म्हणाल्या, की बरेचदा गैरसोय होते. तेव्हा संकोच बाजूला ठेवून आयोजकांसमोर अडचणी मांडणे भाग असते.
‘ओंजळीतील फुले’, ‘जरा विसावू कवितेपाशी’ असे कवितांचे कार्यक्रम करणाऱ्या शांभवी बोधे म्हणाल्या, की कविता म्हटली की आधीच नाकं मुरडली जातात. कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसादही समाधानकारक नसतो. पण एकदा लोकांना कार्यक्रमाचा दर्जा, वेगळेपण कळलं की फारशी अडचण येत नाही़