‘हे’ बहीण-भाऊ दिसावेत आॅनस्क्रीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 02:23 AM2017-03-04T02:23:49+5:302017-03-04T02:23:49+5:30
बहीण-भावाचं नातं हे खूप पवित्र आणि निरागस असतं. मग ते ‘रिअल लाईफ’ असो किंवा ‘रील लाईफ.’
-आबोली कुलकर्णी
बहीण-भावाचं नातं हे खूप पवित्र आणि निरागस असतं. मग ते ‘रिअल लाईफ’ असो किंवा ‘रील लाईफ.’ त्यांच्यामध्येही धिंगाणा, धम्माल, मजा-मस्ती होतच असते. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ अशी बहीण-भावाची गत असते. ‘बी-टाऊन’मध्येही अशा अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत, ज्यांना आपण अनेकदा पार्टीत, आऊटिंगमध्ये एकत्र पाहिलंय. मात्र, कधीही त्यांना आॅनस्क्रीन एकत्र काम करतांना पाहिलं नाही. चला तर मग कोणत्या आहेत या जोड्या पाहुयात ज्यांना आपल्याला आॅनस्क्रीन पाहायला आवडेल...
रणबीर-करिना
रणबीर कपूर आणि करिना कपूर खान हे दोघं चुलत भाऊ-बहीण. चार्मिंग आणि ब्युटीफुल बहीण-भावाचं कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. इतरांप्रमाणे या दोघा बहीण-भावांनाही आपण अनेकदा पार्टीत, कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहिलंय. मात्र, एकमेकांसोबत काम करण्याची दोघांचीही इच्छा असूनही त्यांना आॅनस्क्रीन कधीही एकत्र काम करता आलं नाही. एका मुलाखतीत बोलताना करिनाने रणबीरसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
सोनम -हर्षवर्धन
बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूर याची तिन्ही मुलं सोनम, हर्षवर्धन, रिहा हे केवळ एकमेकांचे बहीण-भाऊ नसून चांगले मित्र-मैत्रीणदेखील आहेत. एकदा एका मुलाखतीत बोलताना सोनमने रिहा ही माझी उत्तम गाईड असल्याचे स्पष्ट केले. या तिघांमधील बाँडिंग ही कोणत्याही बहीण-भावाला हेवा वाटावा अशी आहे. हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये ‘मिर्झियाँ’मधून डेब्यू केला होता. मात्र, आतापर्यंत हर्षवर्धन आणि सोनम यांना एकत्र एकही चित्रपट मिळाला नाही. पण, त्यांना नक्कीच एकत्र पाहायला आपल्याला आवडेल.
फरहान-झोया
फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोघं जावेद अख्तर यांची मुलं. लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रवास करणाऱ्या या बहीण-भावाच्या जोडीने नव्या दमाची, नव्या विचारांची पिढी चित्रपटांच्या माध्यमातून व्यक्त करते. ‘माझ्या दोन्ही मुलांनी असे काही कमावले आहे, जे मी या चंदेरी दुनियेत कधीही कमावू शकलो नाही,’ असे स्वत: जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले. हे दोघे बहीण-भाऊही आतापर्यंत एकत्र आॅनस्क्रीन कधीच दिसले नाहीत. मात्र, त्यांना आॅनस्क्रीन पाहायला नक्कीच आवडेल.
सोनाक्षी-लव
सोनाक्षी सिन्हा आणि लव सिन्हा ही दोघं शत्रुघ्न सिन्हाची मुलं. सोनाक्षी बॉलिवूडमध्ये दमदारपणे वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. लव सिन्हाने बॉलिवूडमध्ये एका चित्रपटातून डेब्यू केला आहे. या दोघांची बहीण-भाऊ म्हणून एकदम ग्रेट बाँडिंग अनेकदा पार्टी, सोहळ्यांमध्ये दिसून आली आहे. मात्र, हे दोघे बहीण-भाऊ आॅनस्क्रीन कधीही एकत्र दिसले नाहीत. नक्कीच या दोघांना पडद्यावर पाहायला आपल्याला आवडेल.
इमरान हाश्मी-आलिया भट्ट
गरजेला मदत करणं, मार्गदर्शन करणं, धम्मालमस्ती करणं हेच तर खऱ्या बहीण-भावांचं नातं असतं. असेच एक बहीण -भाऊ ‘बी-टाऊन’ मध्ये आहेत. ते म्हणजे इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट हे दोघं चुलतभाऊ-बहीण. नेहमी एकमेकांचे मार्गदर्शक, समर्थक. आलिया बऱ्याचदा तिच्या चित्रपटाबद्दल इमरानकडून गाइडन्स घेते. असे अनोखे, समंजस बहीण-भाऊ नक्कीच आपल्याला पडद्यावर पाहायला आवडतील.
>हुमा-साकेब
‘बी-टाऊन’चं सगळ्यात हॉट बहीण-भाऊ म्हणून हुमा आणि साकेब यांच्याकडं पाहिलं जातं. या दोघांचं नातं हे एवढं मनमोकळं आहे की, कधी कधी भास होतो, की हे खरंच भाऊ-बहीण आहेत की, क्यूट कपल? मात्र, एखाद्या चित्रपटात एकमेकांसोबत अत्यंत मनमोकळेपणाने राहणारे, भांडणारे बहीण-भाऊ म्हणून त्यांना एखाद्या चित्रपटात घ्यायला काहीच हरकत नाहीये.