‘छोटा पडदा ओळख मिळवून देतो’

By Admin | Published: March 12, 2017 01:50 AM2017-03-12T01:50:45+5:302017-03-12T01:50:45+5:30

सायली संजीवने ‘पोलिस लाईन’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत झळकली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

'Small Screen Gets Recognized' | ‘छोटा पडदा ओळख मिळवून देतो’

‘छोटा पडदा ओळख मिळवून देतो’

googlenewsNext

- Prajakta Chitnis

सायली संजीवने ‘पोलिस लाईन’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत झळकली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिच्या या मालिकेबद्दल आणि तिच्या आजवरच्या प्रवासाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

सायली, आज तू छोट्या पडद्यावर तुझे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहेस. तुझा हा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?
- मी अभिनेत्री होईन असा मी कधी विचारदेखील केला नव्हता. मला स्वत:ला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रचंड रस आहे. मला पॉलिटिकल अ‍ॅनालिसिस्ट बनायचे होते. पण मी कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत काम केले होते. त्या एकांकिकेसाठी मला राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला. त्या एकांकिकेला प्रवीण तरडे परीक्षक म्हणून आले होते. तू स्क्रिनवर छान दिसशील, आॅडिशन्स दे असे ते मला म्हणाले आणि या एकांकिकेमुळे माझा अभिनयप्रवास सुरू झाला. मी सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. प्रियांका चोप्रासोबतदेखील मी एक जाहिरात केली होती. त्यानंतर मी पोलिस लाईन या चित्रपटात काम केले.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली आणि या मालिकेमुळे तुझे आयुष्य कसे बदलले?
- मला फेसबुकवर एक मेसेज आला होता की, क्या आप अ‍ॅक्टिंग करते हो आणि त्यावर मी हो बोलल्यानंतर मला या मालिकेच्या आॅडिशनविषयी सांगण्यात आले. आॅडिशन दिल्यानंतर या भूमिकेसाठी माझी निवड झाली. खरे तर मालिकेसाठी निवड झाल्यानंतरही ही मालिका करायची नाही असे मी ठरवले होते. कारण त्याच वेळी माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि मला जास्तीत जास्त वेळ त्यांना द्यायचा होता. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर आणि वाहिनीच्या मंडळींनी मला खूप समजावले. तुला पाहिजे तेवढा वेळ तू त्यांना दे असे मला सांगितले आणि त्यांच्यामुळेच मी ही मालिका स्वीकारली. या मालिकेमुळे आता मला प्रेक्षक गौरी या माझ्या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखायला लागले आहेत. या मालिकेने मला एक नवी ओळख मिळवून दिली.

तू चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम केले आहेस, तुझ्या दृष्टीने कोणते माध्यम अधिक लोकप्रियता मिळवून देते?
- चित्रपटांपेक्षा देखील मालिका तुम्हाला अधिक लोकप्रियता मिळवून देते. मालिका तुम्हाला फेस व्हॅल्यू देते. चित्रपट हे माध्यम मोठे आहे असे मानणारे आणि मालिकांना दुय्यम स्थान देणारे अनेक जण आहेत. पण डेली सोप तुम्हाला लोकांच्या घराघरांत पोहोचवते. चित्रपट हे माध्यम वाईट आहे असे मी कधीच म्हणणार नाही. पण मालिका या माध्यमात तुम्हाला शिकायला अधिक मिळते असे मला वाटते.

भविष्यात तुझे काय प्लॅन्स आहेत?
- मला सध्या चित्रपटाच्या अनेक आॅफर्स येत आहेत. पण अद्याप तरी मी चित्रपटात काम करण्याविषयी काहीही विचार केलेला नाही. सध्या मालिकेसोबतच मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करत आहे. मी यावर्षी एम.ए साठी प्रवेश घेणार असून भविष्यात मला पॉलिटिकल सायन्समध्ये पीएच.डी. करण्याची इच्छा आहे.

Web Title: 'Small Screen Gets Recognized'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.