'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा; स्मृती इराणी यांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:25 AM2023-03-26T09:25:15+5:302023-03-26T09:26:29+5:30
स्मृती इराणी यांनी हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.
'क्योकी सांस भी कभी बहू थी' ही मालिका माहित नाही असं कोणीच नसेल. घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) 'तुलसी' या भूमिकेमुळे लोकप्रिय झाल्या होत्या. सात वर्ष त्यांनी मालिकेत काम केलं. मात्र इतक्या वर्षात त्यांना जितकी लोकप्रियता मिळाली तितकेच वाईट अनुभवही आले. हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव त्यांनी नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.
गीतकार नीलेश मिश्रा (Nilesh Mishra) यांना दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी मालिकेच्या शूटदरम्यानचे अनेक किस्से, आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, 'मालिकेत काम करत असताना मी गरोदर होते. एक दिवस मला अस्वस्थ वाटू लागलं. मी निर्मात्यांना घरी जाऊ द्यावं अशी विनंती केली. सोनोग्राफीसाठी रुग्णालयात जात असतानाच रस्त्यातच माझं रक्त वाहू लागलं. त्यावेळी पाऊसही पडत होता. मी रिक्षा रुग्णालयातच घेऊन जाण्यास सांगितलं. रुग्णालयाबाहेर पोहोचताच एक नर्स धावतच माझ्याकडे आली. त्याही परिस्थितीत तिनं माझ्याकडे ऑटोग्राफ मागितला. मी तिला निराश केलं नाही. मी तिला सांगितलं की मला अॅडमिट व्हावं लागणार आहे कारण बहुतेक माझं मिसकॅरेज झालं आहे.'
त्या पुढे म्हणाल्या, 'मिसकॅरेज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी घरी आले. तेव्हा मला प्रोडक्शन हाऊसचा फोन आला. मी त्यांना सगळं सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलं सकाळी नाही पण दुपारी २ च्या शिफ्टला या. तेव्हा मी क्योकी.. आणि रामायण अशा दोन मालिकेत काम करत होते. क्योकी मधून मला असा प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे रामायण मालिकेचे रवी चोप्रा यांनी मात्र मला पाठिंबा दिला होता. तुझ्यावर इतकं मोठं दु:ख कोसळलं आहे. वेडी आहेस का अशा परिस्थितीत कामावर यायला, मी बघतो काय करायचं ते असं ते म्हणाले होते.'
एकता कपूरला दाखवला पुरावा
रवी चोप्रा यांना स्मृती इराणी यांनी सांगितलं की त्या क्यो की.. च्या सेटवर परत येत आहेत. तर रवी चोप्रा यांनी त्यांच्या शिफ्टला आराम करण्याचा सल्ला दिला. 'क्योकी' च्या सेटवर पोहोचल्यावर त्यांना कळलं की कोणीतरी एकता कपूरचे कान भरले आहेत. त्या मिसकॅरेजबाबत खोटं बोलत आहेत असं सांगण्यात आलंय.यानंतर स्मृती इराणी यांनी एकता कपूरला मेडिकल पेपर्स पुरावा म्हणून दाखवले होते. यावर हे दाखवायची गरज नाही असं एकता त्यांना म्हणाली होती.