मराठी इंडस्ट्रीत चिमुरड्यांची धूम

By Admin | Published: April 13, 2016 01:42 AM2016-04-13T01:42:18+5:302016-04-13T01:42:18+5:30

छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखा ना रे... या गाण्यातूनच लहान मुलांचा अ‍ॅटिट्यूड दिसून येतो. मग या चिमुरड्यांसाठी बॉलीवूड असो या मराठी चित्रपट, ते बनलेच पाहिजेत.

Smurfs in the Marathi Industry | मराठी इंडस्ट्रीत चिमुरड्यांची धूम

मराठी इंडस्ट्रीत चिमुरड्यांची धूम

googlenewsNext

छोटा बच्चा जान के ना कोई आँख दिखा ना रे... या गाण्यातूनच लहान मुलांचा अ‍ॅटिट्यूड दिसून येतो. मग या चिमुरड्यांसाठी बॉलीवूड असो या मराठी चित्रपट, ते बनलेच पाहिजेत. कारण आजची लहान मुले ही उद्याचे भविष्य असतात. त्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून संदेश व प्रेरणा देणारे चित्रपट हे असलेच पाहिजे. जसे की, बॉलीवूडमध्ये तारे जमीन पर, स्टेनली का डब्बा, मकडी, मिस्टर इंडिया व नुकताच प्रदर्शित झालेला ‘द जंगल बुक’ या चित्रपटांनी बॉलीवूड गाजविले आहे, तर मराठी इंडस्ट्रिमध्ये एलिझाबेथ एकादशी, बालक-पालक, शाळा, फँड्री, किल्ला, श्वास, यलो, वेलडन भाल्या, सहा गुण, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांसारख्या चित्रपटांनी बालचित्रपट म्हणून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातील काही चित्रपटांनी कित्येक राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळविले आहे. अशाच काही चित्रपटांचा ‘लोकमत सीएनएक्स’ने घेतलेला हा आढावा...

चिमुरड्यांच्या अभिनयाने प्रत्येक चित्रपटाने समाजाला चांगला संदेश दिला आहे. बालक-पालक या नात्याची गरज सांगणाऱ्या चित्रपटांनी मराठी इंडस्ट्रीवर आपला ठसा उमटविला आहे, पण पालक-बालक यांचे नाते जपणाऱ्या या चित्रपटांची खरच आज एक गरज बनली आहे. असो, पण लहानग्यांच्या या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर करोंडोचा गल्ला कमविला आहे. शेवटी, बच्चों के लिए मुव्हीं तो बनता है!

फँड्री : मराठी इंडस्ट्रीवर आपल्या दिग्दर्शनाने राज्य करणारा तरुणांचा लाडका दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा हा फँड्री चित्रपट तरुणांनी उचलून धरला. ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या या चित्रपटानेदेखील करोडोचा गल्ला बॉक्स आॅफिसवर कमविला होता. या चित्रपटातील सोमनाथ अवघडे या लहानग्याने केलेल्या जब्याची भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड दाद दिली होती, तर ‘जीव झाला हा येडापिसा’ या गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून ठेवले होते.

यलो : महेश लिमये दिग्दर्शित ४ एप्रिल २०१४ ला प्रदर्शित झालेला यलो हा चित्रपट खरच लहान मुलांना प्रेरणा देणारा व आत्मविश्वास वाढविणारा आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील अभिनेता रितेश देशमुख याने केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. गौरी गाडगीळ हिचा अभिनय तर सलाम ठोकणाराच होता. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, ऋषिकेष जोशी, उपेंद्र लिमये, ऐश्वर्या नारकर या तगड्या कलाकारांचा समावेश आहे.

एलिझाबेथ एकादशी : श्रीरंग महाजन व सायली भंडारकवठेकर या दोन चिमुरड्यांनी या चित्रपटातून भाव-बहिणींच्या नात्याने आपल्या अभिनयाने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटातील ‘दगड... दगड...’ या गाण्याने तर धमाका उडवून दिला आहे. या चित्रपटाने कित्येक आंतरराष्ट्रीय महोत्सवातदेखील आपले वजन दाखविले आहे. यातील सायलीने म्हटलेल्या ‘बांगड्या घ्या.. बांगड्या गरम गरम बांगड्या’ हा डॉयलॉग तर अविस्मरणीय राहणार आहे.

बालक-पालक : रवी जाधव दिग्दर्शित बालक-पालक या चित्रपटाने आॅफिसवर करोडोंचा गल्ला जमविला आहे, तर बॉलीवूडचा तगडा नायक रितेश देशमुख याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. लहान मुलांच्या परफेक्ट व करेक्ट भावना पकडून केलेला हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, भाग्यश्री संकपाळ, रोहित फाळके या लहानग्यांनीदेखील उत्तम भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटाला विशाल-शेखर यांनी संगीत देऊन चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

किल्ला : अविनाश अरुण दिग्दर्शित किल्ला या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून मराठी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटविला आहे, तसेच या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येदेखील आपली जागा निर्माण केली. या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव या चिमुरड्यांच्या भूमिका लाजवाब राहिल्या आहेत, तसेच अभिनेत्री अमृता सुभाष हिलादेखील या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा चित्रपट २६ जून २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता.

Web Title: Smurfs in the Marathi Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.