म्हणून आहे मी फिट!
By Admin | Published: May 22, 2016 01:58 AM2016-05-22T01:58:50+5:302016-05-22T01:58:50+5:30
सध्याचं जीवन खूपच धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. कामासाठी दगदग, ताणतणाव हे नित्याचं झालंय. मराठी सेलीब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत.
सध्याचं जीवन खूपच धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. कामासाठी दगदग, ताणतणाव हे नित्याचं झालंय. मराठी सेलीब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. अनेक मराठी अभिनेत्री दिवसाचे १२-१४ तास सिनेमा आणि मालिकांच्या सेटवर शूटिंग करत असतात. या कामाच्या व्यापात स्वत:च्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं हाच फिटनेस फंडा सांगताहेत मराठीतल्या अभिनेत्री.
सोनाली कुलकर्णी
अभिनयासोबतच फिटनेसबाबतही जागरुक असणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी मी खास प्रयत्न करत असते. त्यासाठी दररोज सायकलिंग करते. शूटिंगमध्ये बिझी असतानाही दररोज सायकलिंग करते. भरपूर पाणी पिते. शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव कमी व्हावा म्हणून आवडीची गाणी ऐकते आणि प्राणायमसुद्धा करते.
मनीषा केळकर
सध्या अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा, जिम, डाएट या गोष्टी करतात. मात्र स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यासोबतच मी मार्शल आर्टचा सराव करते. दोन वर्षांपासून त्याचं प्राथमिक शिक्षण मी घेत आहे. सध्या यासाठी जुहू बीचवर दररोज पहाटे पाच वाजता सराव करते. माझा आदर्श खिलाडी अक्षय कुमार आहे. त्यामुळं तो ज्या पद्धतीने फिट आहे. त्याप्रमाणे फिट राहण्याचा माझाही प्रयत्न असतो. फिटनेस सोबतच स्वसंरक्षणासाठी प्रत्येक मुलीनं मार्शल आर्टचं प्रशिक्षण घ्यायलाच हवं. या मार्शल आर्टचा मला आगामी सिनेमासाठीही फायदा होणार आहे.शीतल उपरे
फिट राहण्यासाठी मी नियमित डाएट फॉलो करते. डाएट फॉलो करताना वेळेवर खाणं पिणं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रथिनयुक्त गोष्टी आणि कडधान्यं माझ्या आहाराचा प्रमुख घटक असतो. तसंच डाएटसोबतच वर्कआऊटवरही खास लक्ष देते. वर्कआऊटला सुरुवात करण्याआधी दही, एक सफरचंद आणि अगदी थोडी कॉफी घेते. त्यानंतर वर्कआऊट पूर्ण केल्यावर प्रथिनयुक्त सोयादूध घेते. मी संपूर्ण शाकाहारी आहे. याशिवाय जेवणात खूप सारं सॅलेड, फळं आणि ज्यूसचाही समावेश असतो. या सर्व गोष्टी तुम्हाला फिट ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळं योग्य डाएट, वर्कआऊट आणि वेळेवर जेवण केल्यास तुम्ही फिट राहू शकता. त्यामुळं या गोष्टी फॉलो करा आणि रहा फिट.माधवी निमकर
फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं मी पारंपरिक योगा करते. माझी प्रशिक्षक रिमा वेंगुर्लेकर मला योगा शिकवते. रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत आम्ही योगाभ्यास करतो. तसंच आरोग्यदायी डाएटवर माझा भर असतो. डाएट म्हणजे कमी खाणं असं अनेकांचा गैरसमज आहे. मात्र तसं काही नसतं. मी आरोग्यला पोषक असं डाएट घेते म्हणजेच तेलकट पदार्थ खाणं टाळणं. मी भात खात नाही. जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त तूप घेत नाही आणि गोडही कमी खाते. सध्या मी स्विमिंग शिकतेय. अशारितीने योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट आणि व्यायाम यामुळं मी स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवू शकते.