...म्हणून आज मी तुमच्यात आहे!

By Admin | Published: March 3, 2017 02:47 AM2017-03-03T02:47:25+5:302017-03-03T02:47:25+5:30

१९९१ च्या दरम्यान माझ्यापुढे दोन मार्ग होते. एकतर मी इंजिनियर होणार होतो

... so today I am with you! | ...म्हणून आज मी तुमच्यात आहे!

...म्हणून आज मी तुमच्यात आहे!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी
१९९१ च्या दरम्यान माझ्यापुढे दोन मार्ग होते. एकतर मी इंजिनियर होणार होतो आणि दुसरे क्षेत्र संगीतात करीयर करण्याचे होते. पहिल्या मार्गात मला चांगली नोकरी मिळणार होती, परदेशात राहून भरपूर पैसे कमावण्याची संधी होती आणि दुसऱ्या मार्गात मला कोणतेच चित्र स्पष्ट नव्हते. संगीतात राहून मला कोण नोकरी देणार? किती पैसे मिळणार? यश मिळेलच याची खात्री काय? असे सगळे प्रश्नच प्रश्न होते. पण माझ्या आईने मला सपोर्ट केला. माझी पत्नी संगिताने मला खूप मोठा आधार दिला आणि आज मी तुमच्यात आहे... प्रख्यात गायक, संगीतकार आणि आपल्या जादूई आवाजाने घराघरात गेलेले शंकर महादेवन आज शुक्रवारी ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी लोकमतशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
- आज आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण उभे आहात. काय वाटते? असे विचारले आणि सुरांचा हा बादशहा गाता झाला...
आज मी मागे वळून पहातो तेव्हा मला खूप भरुन येते. खूप अभिमानही वाटतो. एवढे प्रयोग मला नाही वाटत कोणाच्या आयुष्यात झाले असतील. मी हिंदी, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायलो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाण्याचे विविध प्रकार मला गायला मिळाले. असा कोणताही गाण्याचा प्रकार नाही ज्यात मला गाण्याची संधी मिळाली नाही. आज हे सगळे पहातो तेव्हा खूप मोठे समाधान मला मिळते.
- तुम्ही मराठीत ‘कट्यार काळजात घुसली’ सारखा चित्रपटही केला. तो लोकांना एवढा आवडेल, लोक हा चित्रपट कायम जतन करुन ठेवतील असे तुम्हाला हा चित्रपट करताना वाटले होते का?
खरे सांगायचे तर असे बिलकूल वाटले नव्हते. शास्त्रीय संगीतावर आधारीत चित्रपट करणे तेही आजच्या काळात हे खूप मोठे धाडस होते. संगीताच्या क्षेत्रात हे असे किती जणांना आवडेल असा प्रश्न होताच. पण जगात देव आहे... त्या चित्रपटाने मला महाराष्ट्रात आणि जगातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या घरात नेले. हे आज मागे वळून पाहिले तर अशक्य वाटते पण ते आम्हा सगळ्यांकडून होऊन गेले. खूप समाधानी आहे मी त्यासाठी... आणि हो, याच चित्रपटातल्या गाण्यासाठी मला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ हा पुरस्कारही मिळाला होता बरंका... (हसत हसत शंकरजींनी त्या कार्यक्रमाची आणि त्यासाठी गायलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची आठवण ताजी केली. हे गाणे आजही यू ट्यूबवर जोरात गाजते आहे)
- तुम्ही गाण्यात आणि संगीतात एवढे वेगवेगळे प्रयोग केले. अगदी कभी हां, कभी ना, पासून ब्रेथलेस पर्यंत याविषयी काय सांगाल?
आजही मी दर आठवड्याला दोन ते तीन संगीताचे कार्यक्रम करतो. गेली २० ते २५ वर्षे मी हे करतोय. आजही मला लोक बोलावतात. त्यांना आवडणाऱ्या भाषेतले गाणे मला गायला सांगतात. मी ही ती गाणी गातो. एवढी वर्षे एकच एक गाणे न गाता मला गाण्याचे अनेक प्रकार गायला मिळाले, अनेक भाषा मला गाता आल्या आणि लोक आजही तेवढ्याच प्रेमाने, हक्काने ती गाणी गाऊन घेत आहेत, मला ऐकत आहेत... वयाच्या या पन्नाशीच्या दिवशी यापेक्षा दुसरा मोठा आनंद काय असू शकतो, तुम्हीच सांगा...
- आज नवीन नवीन गायक येत आहेत, गायिका येत आहेत. तुम्ही एवढे अनुभव घेतले आहेत. काय सांगाल या सगळ्याना...
- मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपल्याला काय करायचे आहे हे आपण ठरवले पाहिजे. माझ्या आयुष्यात जसा एक टर्निंग पॉर्इंट आला तसा तो सगळ्यांच्या आयुष्यात येतो. तो शोधता आला पाहिजे आणि त्यावर मनापासून मेहनत केली पाहिजे. आज एखादे गाणे तुम्हाला प्रसिध्दी देऊन जाते पण तेवढ्यावर समाधान न मानता मेहनत केलीच पाहिजे. प्रसिध्दी मिळणे आणि सुरांचे ज्ञान मिळणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही काहीही करुन प्रसिध्दी मिळवू शकता पण ज्ञान मिळवण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नसतो. तरुण पिढी खूप हुशार आहे. मी यापेक्षा जास्ती काय सांगणार...
- तुमच्या ५० व्या वाढदिवसाची पत्रिका देखील संगीतमय केलीय... कोणाची कल्पना होती ती...
माझ्या वाढदिवसाच्या पत्रिकेतूनही संगीत यायला हवे असे माझ्या पत्नीला, संगीताला आणि माझी दोन्ही मुलं सिध्दार्थ आणि शिवम् यांना वाटले आणि त्यांनी ही पत्रिका बनवली आहे. आज मी त्यासाठी ही खूप खूष आहे त्या तिघांवर...
लोकमतच्या कोटी कोटी वाचकांच्या वतीने शंकर महादेवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या छोट्याश्या गप्पा आटोपल्या...

Web Title: ... so today I am with you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.