...म्हणून श्रीदेवी यांना तिरंग्याचा मान आणि पोलिसांची सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:57 PM2018-02-28T18:57:13+5:302018-02-28T20:35:56+5:30
पती बोनी कपूर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्याने लपेटण्यात आले होते.
मुंबई - बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्यावर विलेपार्लेतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पती बोनी कपूर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले असून, त्या अनंतात विलीन झाल्या आहेत.
2013 मध्ये श्रीदेवी यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रीदेवी यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे श्रीदेवींना तिरंग्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी 21 तोफांची सलामी देऊन त्यांचा सन्मानाने निरोप दिला.
शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या अवघ्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (27 फेब्रुवारी) रात्री उशीरा दुबईहून मुंबईमध्ये आणण्यात आले. यानंतर आज सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लब येथे ठेवण्यात आले होते. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी केली होती.
श्रीदेवी यांचा प्रवास -
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....
जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.
यांनी व्यक्त केलं दुख -
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.