सैनिकहो, तुमच्यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:18 PM2019-02-22T16:18:48+5:302019-02-22T16:19:20+5:30
मिलिंद कुलकर्णी पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृृत दहशतवाद्यांनी केलेल्या विघातक घटनेत ४९ भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभर संताप आणि ...
मिलिंद कुलकर्णी
पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृृत दहशतवाद्यांनी केलेल्या विघातक घटनेत ४९ भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभर संताप आणि शोक अशा संमिश्र भावना दाटल्या आहेत. पाकिस्तानचा ध्वज जाळणे, कँडल मार्च काढून शहिद सैनिकांना श्रध्दांजली वाहणे, रक्तदान शिबीर घेऊन शहिदांना आदरांजली वाहणे, ठिकठिकाणी फलके वाहून शहिदांचे स्मरण करणे अशा कृतीतून सामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहे. देशप्रेम आणि सैनिकांविषयी आदरभावाला अशा प्रसंगी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते.
दहशतवादी हल्लयाने संतप्त झालेल्या देशवासीयांना शहिद सैनिकांविषयी जाणता वा अजाणता होणारी विपरीत कृती असह्य होते, याचीही अनुभूती याकाळात आली. हल्लयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली, त्यांची हास्यमुद्रा होती, यावरही नापसंती व्यक्त झाली. शहिद सैनिकाच्या अंत्यदर्शनाला गेलेल्या मंत्र्याने पादत्राणे न काढल्याने नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले.
लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान जय किसान’चा नारा हा भारतीय नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि हृदयाला थेट हात घालणारा आहे. प्रत्येक युध्दावेळी देश आणि देशातील नागरिक सगळे आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. अभूतपूर्व अशा एकतेचा परिचय देतात. हीच खरी देशभक्ती आहे. सैनिक रात्रेंदिवस सीमेवर जागता पहारा देत असल्याने आपण नागरिक सुखाने झोप घेऊ शकतो, जगू शकतो हे वास्तव असल्याने सैनिकांवर हल्ला झाला की, नागरिकांना तो जिव्हारी लागतो.
लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणारी मंडळीदेखील समाजात आहेत. पण ती जागरुक नागरिकांमुळे तोंडघशी पडत आहेत. समाजाच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागत आहे. पक्षीय भेदांपासून अलिप्त होत सर्वच राजकीय पक्षांनी सरकार आणि लष्काराला संपूर्ण सहकार्य करण्याची आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची स्वागतार्ह आणि परिपक्व अशी भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार आता पाकिस्तानला कसे उत्तर देतात, याविषयी जनमानसात उत्सुकता आणि उत्कंठा आहे. तुमच्याइतकाच संताप माझ्याही मनात आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. बदला निश्चित घेऊ, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. जनमानसातील भावना त्यांच्या मुखातून व्यक्त होत आहे. मात्र ही संयमाची परीक्षा राहणार आहे.
सरकारने काय केले पाहिजे याविषयी वेगवेगळ्या भूमिका, मतांतरे व्यक्त होत आहे. कुणाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानात शिरुन केलेल्या हल्लयाची आठवण होते आहे, तर कुणी पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक ’ करा असे आवाहन करीत आहे. अपेक्षा व्यक्त होणे स्वाभाविक आहे, परंतु संरक्षणविषयक तज्ज्ञ असल्याच्या थाटात समाज माध्यमे आणि गप्पांमध्ये काही लोक जे अकलेचे तारे तोडतात, ते पाहून त्यांची किव करावीशी वाटते.
सरकार, लष्कर, सुरक्षाविषयक तज्ज्ञ ही मंडळी अभ्यासपूर्वक काम करीत आहे. आततायीपणापेक्षा योग्य वेळेची वाट पाहत कारवाई होईल, असा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? देश, सैन्य यांचा पूर्णत: विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे. पण आम्ही स्वत:च तज्ज्ञ असल्याच्या थाटात बोलतो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, याला काय अर्थ आहे?