सुप्रियाचे काही रंग असेही...
By Admin | Published: August 5, 2016 02:18 AM2016-08-05T02:18:30+5:302016-08-05T02:18:30+5:30
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये नेहमीच प्रेमळ भूमिका साकारते.
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये नेहमीच प्रेमळ भूमिका साकारते. पण ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत प्रेक्षकांना सुप्रियाचे एक वेगळे रूप पाहायला मिळत आहे. या तिच्या भूमिकेबाबत सुप्रियाने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...
एका प्रेमळ आईची, वहिनीची भूमिका साकारल्यानंतर तू एका वेगळ्या भूमिकेत झळकायचे कसे ठरवले?
- कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील माझी भूमिका नकारात्मक आहे, असे मी म्हणणार नाही. आई आणि मुलामधील असलेला स्पेशल बाँड या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण आईला आपला मुलगा आपल्यापासून दूर जात आहे, असे ज्या वेळी वाटते, त्या वेळी तिच्या मनाची जी घालमेल होते, ती त्या स्थितीत ज्या प्रकारे वागते त्याला आपण नक्कीच निगेटिव्ह भूमिका म्हणू शकणार नाही. पण या मालिकेतील माझी भूमिका ही माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. मी साकारत असलेली व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यातही असू शकते, असे वाटल्यामुळेच मी ही मालिका स्वीकारली.
तुझ्या मुलीचे आणि तुझे बाँडिंग कसे आहे?
- माझ्या मुलीचे आणि माझे नाते हे एखाद्या मैत्रिणीसारखे आहे. ती प्रत्येक गोष्ट मला सांगते. त्यामुळे तिने कधी माझ्यापासून काही लपवले तर तो धक्का मी सहनच करू शकत नाही. त्यामुळे या मालिकेतील व्यक्तिरेखा अशा प्रकारे का वागतेय, याची मला चांगलीच कल्पना आहे.
मालिका स्वीकारताना तू पहिला काय विचार करतेस?
- मालिका स्वीकारताना सांगितलेली व्यक्तिरेखा आणि त्यानंतर मालिकेत साकारावी लागणारी व्यक्तिरेखा यामध्ये अनेक वेळा फरक असतो. मी गेल्या वर्षी केलेल्या एका मालिकेत मला ते चांगलेच जाणवले होते. त्यामुळे मालिकेची कथा भरकटली नाही तरच त्या मालिकेत काम सुरू ठेवायचे, हे माझे अगदी पक्कं आहे. मी मालिका स्वीकारतानाच या गोष्टीची निर्मात्यांना कल्पना देते. मालिका करीत असताना तुम्हाला दिवसातील अनेक तास द्यावे लागतात. तुम्हाला कुटुंबालाही वेळ द्यायला मिळत नाही. इतका वेळ देऊन तुम्हाला कामातून समाधान मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही, असे मला वाटते.
तू तू मैं मैं या मालिकेत तू एक विनोदी भूमिका साकारली होतीस, पण त्यानंतर तू विनोदी भूमिकांकडे वळली नाहीस, याचे कारण काय?
- तू तू मैं मैं करीत असताना मी केवळ विनोदी ढंगाच्या भूमिका साकारू शकते, असेच लोकांना वाटायला लागले होते. त्यामुळे मला विनोदी भूमिकाच आॅफर केल्या जात होत्या. पण राधा की बेटीया कुछ कर दिखायेगी या मालिकेत मी साकारलेल्या भूमिकेमुळे माझी ही प्रतिमा बदलली गेली. पण आता राधा की बेटिया या मालिकेला अनेक वर्षं होऊनही मला साधारण त्याच प्रकारच्या भूमिका आॅफर होत आहेत. एखादी चांगली विनोदी ढंगाची भूमिका साकारायची, माझी नक्कीच इच्छा आहे.
मराठी चित्रपटांमध्ये तू कित्येक दिवसांत झळकली नाहीस, प्रेक्षकांना मराठी चित्रपटात तुला पुन्हा कधी पाहायला मिळेल?
- मी मालिका करीत असताना मला चित्रपटाच्या अनेक आॅफर्स येतात. पण वेळेच्या अभावामुळे मला चित्रपट करणे शक्य होत नाही. मालिका करीत नसताना माझ्याकडे वेळ असतो, पण त्या वेळी कोणीच मला चित्रपटासाठी विचारत नाही, असा माझा अनुभव आहे. मला वेळ असताना चांगली आॅफर आली तर मी मराठी चित्रपटामध्ये नक्कीच झळकेन.