‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’मध्ये बॉलिवूडमधील काही मनोरंजक किस्से
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:08 PM2019-04-18T20:08:51+5:302019-04-18T20:10:18+5:30
सोनी मॅक्स2च्या ‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’ या शोमध्ये बॉलिवूडमधल्या काही महत्त्वाच्या चित्रपटांविषयीचे रोचक आणि रंजक किस्से पहायला मिळणार आहेत.
बॉलिवूडची अशी स्वत:ची जादू आहे. मग पडद्यावरच्या कथा असोत किंवा पडद्यामागच्या गोष्टी, बॉलिवूडने कायमच प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. सोनी मॅक्स2च्या ‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’ या शोमध्ये बॉलिवूडमधल्या काही महत्त्वाच्या चित्रपटांविषयीचे रोचक आणि रंजक किस्से पहायला मिळणार आहेत.
१९७०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांना स्त्री भूमिका करताना पाहणे हे प्रेक्षकांच्या सहज पचनी पडणारे नव्हते. माचो हिरोची असलेली प्रतिमा बदलणारे हे पाऊल उचलले ऋषी कपूरने 'रफू चक्कर' या चित्रपटासाठी. प्रेक्षकांना कदाचित आठवत असेल, ती कथा ज्यात ऋषी कपूरला साधारण चित्रपटाच्या ७० टक्के कथेत स्त्री भूमिकेत वावरावे लागले होते. काश्मीरमध्ये एक सीन चित्रित करताना ऋषी कपूरला खूप घाईने लघुशंकेला जायचे होते. पण तो द्विधेत अडकला होता. त्याने स्त्रीचा संपूर्ण पेहराव केला होता आणि पुरुषांच्या वॉशरूममध्ये जाता येणे शक्य नव्हते कारण लगेचच लोकांच्या भुवया उंचावल्या असत्या, पण त्याचवेळी त्याला महिलांच्या प्रसाधनगृहातही जाता येत नव्हते. शेवटी त्याने पेंटलसोबत (तो पण आपल्या वेशभूषेत होता) पुरुषांच्या वॉशरूममध्ये जायचे ठरवले. तिथे असलेल्या दोघा परदेशी नागरिकांना त्यांच्या वागण्याचे आश्चर्यच वाटले. त्यामुळे गोंधळात पडून ते वॉशरूममधून बाहेर आले. ते दोघे ‘पुरुषां’च्या वॉशरूममध्ये घुसलेल्या त्या ‘बाई’चा शोध घेत होते अखेर काही तासांनंतर त्यांचा गोंधळ दूर झाला आणि विचार करा त्यांची काय अवस्था झाली असेल जेव्हा त्यांनी चित्रिकरणादरम्यान ऋषी कपूरला पहिल्यावर त्यांना कळलं असेल की त्यांच्यासोबत वॉशरूममध्ये आलेला तो सुप्रसिद्ध हिरो होता.
ठाम विश्वास आणि अचूकता या दोन गुणांमुळे आमिर खान इतर कलाकारांपेक्षा वेगळा ठरतो. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी घेतलेले कष्ट आणि चित्रपट पाहिले की, त्याचं कौतुक करणं भागच पडतं. तशीच एक भूमिका आहे ती गुलाम चित्रपटातल्या सिद्धार्थ मराठेची. त्याचा अविस्मरणीय ‘दस-दस की दौड’ रेल्वेसमोर धावण्याची शर्यत लावण्याचा सीन बॉलिवूडमधला बहुचर्चित सीन ठरला आणि जेव्हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा बॉलिवूडमध्ये नवी लहर निर्माण झाली. पण आपल्यापैकी खूपच कमी जणांना यामागची खरी कहाणी माहित आहे.
तसेच राजू हिराणी आपल्या पहिल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या कथेसह तयार होता आणि त्याने निर्माता विधू विनोद चोप्रासमोर त्याचा प्रस्तावही ठेवला होता. अनेक चर्चांनंतर आणि अनिल कपूर, विवेक ओबेरॉय यांच्यासारख्या कलाकारांचा विचार केल्यानंतर शेवटी त्यांनी सर्वानुमते मुन्नाभाईच्या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव पक्के केले होते. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय हे दोघे या सिनेमातील प्रमुख भूमिका करणार होते आणि विनोद यांचा झहीरच्या भूमिकेसाठी संजय दत्तला घेण्याचा विचार होता, जो नंतर जिमी शेरगीलने केला. संजय दत्त ही भूमिका करायला उत्सुकही होता आणि त्याने कथा न वाचताच ती भूमिका करायला होकारही दिला होता, त्याच्या व विधू विनोद चोप्राच्या मैत्रीला त्यासाठी धन्यवाद द्यायला हवेत.
पण, नशीबाने आपली खेळी खेळली, शाहरुखने ही भूमिका करायला नकार दिला आणि पुन्हा ‘मुन्ना’च्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाला. एका छोट्या भूमिकेलाही संजयने होकार दिल्याचे विधू विनोद चोप्रांना आवडले होते. त्यामुळे संजयने या कथानकावर दाखवलेल्या विश्वासाच्या बदल्यात त्याला ही महत्त्वाची मुन्नाची भूमिका देण्याचा निर्णय चोप्रांनी घेतला. आपल्या वडिलांसोबत चित्रपटात काम करण्याची ही संजय दत्तची पहिली आणि शेवटची वेळ होती. हा प्रसंग संजय दत्तच्या फिल्मी करिअरला इतकी मोठी कलाटणी देणारा ठरला की, नंतर संजय दत्तच्या जीवनावर बनवलेल्या ‘संजू’ या चित्रपटातही त्याचा उल्लेख झाला आहे.
असे काही बॉलिवूडमधील रंजक किस्से या कार्यक्रमात पहायला मिळणार आहेत.