"काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!", ना. धों महानोर यांच्या निधनानंतर हेमांगीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:14 PM2023-08-03T16:14:23+5:302023-08-03T16:21:12+5:30
Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर ना.धों. महानोर यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सलग दोन दिवस दुःखद वृत्तामुळे सिनेविश्वाला धक्का बसला आहे. काल प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आपल्या एनडी स्टुडिओतच गळफास घेत आत्महत्या केली. तर आज निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचेही निधन झाले. या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वाच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. दरम्यान आता अभिनेत्री हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर ना.धों. महानोर यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर निसर्गकवी ना. धों. महानोर यांचा फोटो शेअर करत लिहिले की, काल नितीन देसाई गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांनी निर्माण केले भव्या दिव्य sets डोळ्यासमोर येत राहीले कुठल्या कुठल्या सिनेमातले आणि कानात एकच गाणं ऐकू येत होतं. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातलं… ‘मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले’ का कुणास ठाऊक? रात्री याच गाण्यातली पावसाळी दृश्य पापण्यांवर तरळत राहीली आणि ओळी ऐकू येत राहील्या. अगदी झोप लागेपर्यंत! सकाळी उठले आणि कळलं आज ‘ना.धो. महानोर’ गेले!
ती पुढे म्हणाली की, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी! आज दिवसभर जैत रे जैत, एक होता विदूषक, मुक्ता, सर्जा मधली गाणी कानात घुमत राहतील! “काल्या एकल्या राती मन मोडून जाती असं एखादं पाखरू वेल्ल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळं” अलविदा, रानकवी!