लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:25 AM2024-06-12T10:25:21+5:302024-06-12T10:26:42+5:30
सोनाक्षी आणि झहीर २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं वृत्त होतं. यावर आता अभिनेत्रीने अखेर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षीची लगीनघाई सुरू असून ती लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोनाक्षी आणि झहीर जून महिन्यात लग्नगाठ बांधणार असून त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली होती. सोनाक्षी आणि झहीर २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं वृत्त होतं. यावर आता अभिनेत्रीने अखेर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने लग्न, रिलेशनशिप याबाबत भाष्य करताना तिच्या लग्नाच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. "पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी यात लक्ष देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा माझा निर्णय आहे. त्यामुळे लोक याबाबत का चिंता करत आहेत, हे मला कळत नाहीये. माझ्या लग्नाबाबत आईवडिलांपेक्षा लोकच जास्त विचारत आहेत. मला ही गोष्ट फार मजेशीर वाटते. पण, आता याची सवय झाली आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे मला काहीच फरक पडत नाही. लोकांना उत्सुकता आहे. याला आपण काय करू शकतो?", असं सोनाक्षी iDiva ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि झहीर यांचं लग्न अगदी साध्यापद्धतीने होणार आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार त्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी आणि झहीर यांचं लग्न होणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.
दरम्यान, सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिचे कुटुंबीयदेखील अनभिज्ञ असल्याचं समजत आहे. सोनाक्षीचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनादेखील लेकीच्या लग्नाबाबत काहीच माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर भाऊ लव सिन्हाने "माझा यात सहभाग नाही", अशी प्रतिक्रिया दिली.