अभिनेत्री बनण्यापूर्वी सोनाली कुलकर्णीने घेतले आहे पत्रकारितेचे शिक्षण, असा आहे अप्सराचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 08:00 AM2020-05-18T08:00:00+5:302020-05-18T08:00:02+5:30
सोनालीचा आज वाढदिवस असून आम्ही तुम्हाला तिच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. आज तिचा वाढदिवस असून आम्ही तुम्हाला तिच्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत.
सोनालीचा जन्म पुण्याच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती. सोनालीच्या वडिलांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले. तिची आई पंजाबी तर वडील हे मराठी आहेत. आर्मी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सोनाली ही अभिनेत्री बनण्याआधी पत्रकार असून तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. पण तिला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयाकडे वळली.
तिने कॉलेज जीवनात असताना एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने अभिनयक्षेत्रातील तिचा प्रवास सुरू झाला. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हा खेळ संचिताचा या मालिकेत देखील काम केले होते. आज तिच्या अभिनयक्षेत्रातील कारकिर्दीला दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तिने या दरम्यान एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हिरकणी या चित्रपटाला तर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सोनालीने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून तिला बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते.