सोनाली आणि गश्मीरने केली लिटिल मास्टर्स सोबत धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:56 PM2022-07-25T15:56:51+5:302022-07-25T15:58:37+5:30
'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' या कार्यक्रमाचे परीक्षक गश्मीर महाजनी आणि सोनाली कुलकर्णी नुकतंच या कार्यक्रमातील लिटिल मास्टर्स सोबत धमाल मजा मस्ती करताना दिसले.
'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कार्यक्रम या आठवड्यात बुधवार पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांसोबतच छोट्या दोस्तांना देखील या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे कारण या कार्यक्रमात चिंचि चेटकीण तिच्या जादूने गम्मत आणणार आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक गश्मीर महाजनी आणि सोनाली कुलकर्णी नुकतंच या कार्यक्रमातील लिटिल मास्टर्स सोबत धमाल मजा मस्ती करताना दिसले.
नुकतंच एका मॉलमध्ये डान्स महाराष्ट्र डान्स मधील स्पर्धक फ्लॅशमॉब करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतानाच सोनाली आणि गश्मीर देखील तिथे उपस्थित राहिले आणि इतकंच नव्हे तर त्यांनी देखील या छोट्या दोस्तांसोबत डान्स केला. लिटिल मास्टर्सचा डान्स आणि त्यांना मिळालेली सोनाली आणि गश्मीरची साथ त्याच्यामुळे तिथे उपस्थित सर्व लोकांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह संचारला. सर्वजणांनी या लिटिल मास्टर्सच्या बाजूला घोळका केला आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिलं. गश्मीर आणि सोनालीने सार्वजणांना डान्स महाराष्ट्र डान्स पाहण्याचं आवाहन केलं.
याविषयी गश्मीरने सांगितले की, रसिकांनी आता पर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. एका अभिनेत्या पलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला अनेकदा मला विचारणा व्हायची की मी डान्सशी निगडित काही करणार आहे का? तर हो आता ती वेळ अली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची ती आता पूर्ण होईल कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन.
तर सोनालीने सांगितले की,या कार्यक्रमात लहान स्पर्धक असणार आहेत त्यामुळे मी खूप उत्सुक आहे कारण आताची पिढी हि खूपच जास्त टॅलेंटेड आहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. हा कार्यक्रम खूपच रंजक असणार अहे कारण याचा फॉरमॅट देखील थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे."