मी ‘सुलोचना’ व्हावे ही दीदींचीच इच्छा होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:55 AM2023-06-05T09:55:36+5:302023-06-05T09:56:58+5:30
खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी आठवणींना उजाळा
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
कोणताही पुरस्कार सोहळा सुलोचनादीदींच्या उपस्थितीशिवाय इमॅजिन करता येऊ शकत नाही. कोणत्याही सोहळ्यात पहिल्या रांगेत सुलोचनादीदी सोफ्यावर बसलेल्या असायच्या. तिथे त्यांना बघत मी मोठी झाली. ‘मुक्ता’ चित्रपटासाठी मला जेव्हा पहिल्यांदा राज्य सरकार पुरस्कार मिळाला, तेव्हा खाली उतरल्यावर मी पहिल्यांदा दीदींना नमस्कार केला होता. त्यांनी पुढे स्वत: ओळख जपली. त्यानंतर मी मुंबईत शिफ्ट झाले. त्यावेळी मी भाड्याच्या घरात राहात होते. माझ्याकडे केवळ पेजर होता. मोबाइल नव्हता. मला एकदा त्या घरात कॉल आला. मी विचारले, कोण बोलतंय? समोरून उत्तर आले की, मी अभिनेत्री सुलोचना बोलतेय. त्या बोलत होत्या, पण माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी काय चांगले केले ते त्या सांगत होत्या. त्यांनी मला माणूस म्हणून खूप काही शिकवले.
दीदींमुळे माझ्यावर झालेले संस्कार इतरांपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य मानते. ही आमच्या मैत्रीची सुरुवात होती. प्रत्येक वेळी त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. कधीही प्रकृतीची तक्रार केली नाही. फिटनेसबाबतही त्या कायम बोलायच्या. छान दिसतेस असे म्हणायच्या. दीदींसोबतचे माझे आणखी एक नाते म्हणजे त्यांचे मूळ गाव खडकलाट हे माझ्या आजोळच्या गळदका गावाच्या जवळ आहे. त्यामुळे सुलोचनादीदी आमच्या इथल्या असल्याचा प्रचंड आनंद आहे. जिथे दीदींनी काळ गाजवला त्या क्षेत्रात मी येणार असल्याने घरातील सर्वांना अभिमान होता आणि माझ्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. त्यांनी जे उज्ज्वल काम केले आहे, त्या परंपरेत भर घालणारेच काम तू कर अशी अपेक्षाच घरातील प्रत्येकाकडून व्यक्त करण्यात आली हा आम्हा दोघींच्या नात्याचा गहिरा पैलू आहे.
‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट बनवताना अभिजीत देशपांडेंनी दीदींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला गोष्ट ऐकवली. दीदींचे व्यक्तिमत्त्व खूप गोड, भारदस्त आणि ममतेने भारलेले असल्याने मी त्यासाठी सूट होणार नसल्याचे माझे म्हणणे होते. त्यामुळे मी अभिजीतला तीन-चार जणींची नावेही सुचवली. त्यानंतर अभिजीतच्या जोडीला निखिल साने आणि सुगंधा लोणीकर यांनी सांगितले की, ही भूमिका तू साकारावी ही दीदींची इच्छा आहे. हे ऐकल्यावर मी पुढे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. कारण कलाकाराच्या अनुभवाचा आणि ज्येष्ठतेचा हा हक्क आहे की, त्यांनी एखादी अपेक्षा व्यक्त करणे आणि आपण ती शिरोधार्य मानून त्यानुसार काम करणे. त्यामुळे या भूमिकेत मी माझ्या परीने प्राण ओतला.
दीदींना ज्या कष्टांमधून जावे लागले, अवहेलना सहन कराव्या लागल्या त्याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढले नाही. या चित्रपटाचा सुलोचनादीदी अविभाज्य घटक असल्याने त्यांच्याकडे, कांचनताईंकडे माझे जाणे वाढले. ही भूमिका साकारायला मिळाल्याने आमच्या मैत्रीला एक वेगळे वळण मिळाले. दीदींची नक्कल न करता त्यांच्यातील धीरगंभीरपणा, गोडवा आणि ममत्व आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर दीदींनी पाठीवर कौतुकाची थाप मारली.
प्रत्येक वेळी कांचनताई मोबाइलवर दीदींना माझ्याशी बोलायला लावायच्या. दीदी म्हणायच्या की, मागच्या वेळी आलीस तेव्हा कावेरीला का नाही आणलेस? तिला फोनवर का नाही बोलावलेस? अशा तक्रारी असायच्या. आपल्या जगण्यावर दीदी आणि कांचनताईंचे लक्ष असल्याचे खूप कौतुक वाटते. जणू काही दीदींचा आशीर्वादच आहे. त्यामुळे आपल्यातीलच एक अंश संपून जावा, कधीच परत मिळणार नाही याची खात्री देऊन अशी काहीशी भावना आज मनात आहे. त्यांना भेटायला रुग्णालयात गेले आणि समोरून त्या गेल्याची बातमी सांगितली गेली तेव्हा हादरून गेले. दीदींनी दिलेल्या ओलाव्यात त्या आपल्या सर्वांमध्ये असल्याची शाश्वती आहे. कारण त्यांचे संस्कार पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.