मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:22 PM2022-04-21T16:22:16+5:302022-04-21T16:23:32+5:30

Chandramukhi, Sonali Kulkarni : ‘चंद्रमुखी’ या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आता मराठी चित्रपट आणि हिंदी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Sonali Kulkarni Share a special post for Chandramukhi marathi movie | मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही...पण..., सोनाली कुलकर्णीची ‘चंद्रमुखी’साठी पोस्ट

googlenewsNext

स्वत:चा नवा चित्रपट प्रदर्शित होणार असताना नेमक्या त्याच क्षणी दुसऱ्या एका सिनेमाचं प्रमोशन करायची दुर्बुध्दी कोणत्या कलाकाराला होईल? कदाचित असं करून कुठलाच कलाकार आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाही. पण हे घडलंय आणि ही दुर्बद्धी नाही तर मनाचा मोठेपणा आहे. मराठी चित्रपट आणि हिंदी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिनं ‘चंद्रमुखी’चं  (Chandramukhi) कौतुक करत हा मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

चंद्रमुखी’ या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटांच्या गाण्यांनीही धुमाकूळ घातला आहे. सोनाली कुलकर्णीनं या आगामी चित्रपटाबद्दल भरभरून लिहिलंय. चंद्रा माझ्यात एव्हाना भिनली आहे, अशा शब्दांत तिने या चित्रपटाचं कौतुक केलंय.  सोनालीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनी आवर्जुन वाचावी, अशीच आहे.

ती लिहिते...

कच्चा लिंबू पासून प्रसाद ओक वर माझं प्रेमच आहे ! तो गोष्टीवेल्हाळ माणूस आहे आणि म्हणूनच तो दिग्दर्शक म्हणून जे काम करतो त्याची उत्सुकता वाटते.. तर..

चंद्रमुखीचं पहिलं गाणं - चंद्रा आलं.. मी ऐकलं.. प्रसादची आणि अजय-अतुलची ( सगळ्यात मोठी ) फॅन म्हणून लगेचंच ऐकलं. मस्त वाटलं.. पण तेवढ्यापुरतंच ! मग मी ते पाहिलं.. दिपाली विचारेनी तरणीताठी / तोऱ्याची / लचकत मुरडत झुलवत ह्या आणि इतर अनेक शब्दांवर जो वणवा पेटवला आहे, अमृतानी तिच्या अदांनी घायाळ केलं आहे.. ते अशक्य आहे.. गुरूनी ही गाणी कशी लिहीली- तोच जाणे..! तर.. पण मग अजय- अतुलचं हे गाणं मला हळूहळू चढायला लागलं आणि गेले काही दिवस तर मी अक्षरशः रोज दोन तीनदा तरी चंद्रा ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही.. सुरुवातीची ढोलकी सुरू झाली की मी दंग होते.. मग श्रेया घोषाल आपल्या स्वर्गीय गायनानी आपल्याला त्या मायाजालात खेचून घेते..

त्या पाठोपाठ ह्या आठवड्यात बाई गं - हे गाणं आलंय..! आर्या आंबेकर आणि आशिष पाटील हे दोघं ऐकताना,बघताना कासावीस करून सोडतात.. माझा स्वतःचा दिल दिमाग और बत्ती हा सिनेमाही आता रिलीज होतोय आणि ज्या बलाढ्य सिनेमाच्यासमोर आमच्या वेगळ्याच सिनेमाचा रिलीज आहे.. आमनेसामने असं नाही, पण तरी चंद्रमुखीचं प्रमोशन करून आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची मला अजिबात दुर्बुध्दी झालेली नाही.. पण कौतुक केल्याशिवाय अक्षरशः राहवेना म्हणून हा लेख प्रपंच..

मी विश्वास पाटीलांची मूळ कादंबरी वाचली नाहीए.. आता सिनेमाच आधी बघणार आहे ! सिनेमाला लाभलेली श्रेय नामावलीच इतकी बुलंद आहे की कुतूहल वाढंतच चाललंय.. ज्या पध्दतीनं पायरीपायरीनं सिनेमाची गाणी आणि व्यक्तिरेखा उलगडतायत.. लाजवाब..!!! प्लॅनेट मराठीच्या प्लॅनिंगला दाद द्यावी तितकी थोडी.

दौलतरावांचा फेटा जो हलकेच उडालाय.. बत्तासा आणि दादासाहेबांची हटके ओळख आणि मुख्य म्हणजे अशी सगळी पात्रं, पट असणारी ही गोष्ट - एक प्रेमकहाणी आहे असं आपल्याला कळतं.. तेंव्हा उत्कंठा आणखीनच वाढते..!

तर चंद्रा… माझ्यात एव्हाना भिनली आहे.. कितीतरी दिवसांनी एक भव्य, संगीतप्रधान आणि रोमॅण्टिक सिनेमा बघायला मिळणार आहे.. त्यासाठी संपूर्ण टीम, प्रसाद + मंजू = खूप शुभेच्छा ... ता. क. अवधूत गुप्ते.. मित्रा.. निखालस प्रशंसा केल्याबद्दल तू रागवणार नाहीस ह्याची मला खात्री आहे. बाकी आपली दिल दिमागची गाणी रॅाकिंग आहेतच

Web Title: Sonali Kulkarni Share a special post for Chandramukhi marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.