‘पानिपत’चं गाणं मन मै शिवा धैर्य, एकता आणि शौर्य साजरे करतं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 PM2019-11-24T18:00:00+5:302019-11-24T18:00:02+5:30
आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमात संगीतालाही तितकंच विशेष स्थान आहे. त्यांच्या आगामी पानिपत सिनेमातही असंच श्रवणीय संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर हे असं नाव आहे की, ज्यांनी आजपर्यंत केलेले सिनेमे हे लार्जर दॅन लाईफ आहेत. त्यांच्या ऐतिहासिक सिनेमांमध्ये असलेली नजाकत, भव्यता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमात संगीतालाही तितकंच विशेष स्थान आहे. त्यांच्या आगामी पानिपत सिनेमातही असंच श्रवणीय संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
उर्जेने भारलेल्या मर्द मराठा हे पानिपतचं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंच आहे. आता आशुतोष गोवारीकरांनी पेशव्यांचे धैर्य, ऐक्य आणि शौर्य साजरे करणारे मन में शिवा हे आणखी एक शक्तीपूर्ण गाणं आपल्यासमोर आणलं आहे. या गाण्यात मराठ्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील मिळवलेला विजय आणि सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पहिल्यांदाच भगवा ध्वज फडकवला होता. हे गाणं लाल किल्ल्यावर उभारलेली विजयाची गुढी साजरी करण्याचं आहे. इतिहासातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या या घटनेवर सिनेमात हे गाणं अर्जुन कपूर, कृती सॅनन आणि चित्रपटातील अन्य मुख्य कलाकारांवर चित्रित करण्यात आलं आहे.
अजय-अतुल या प्रतिभावान संगीतकार जोडीने मन मै शिवा या विजयी गाण्याला संगीतबध्द केलं आहे. या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराज, सदाशिवराव भाऊ , शंकर देवता या तीन शिवांना विशेष आदरांजली वाहली आहे. कुणाल गांजावाला, दीपंशी नगर आणि पद्मनाथ गायकवाड यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं पुन्हा जिवंत करण्यात आलं आहे. तर प्रतिभावान गीतकार जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहलं आहे.
या गाण्याबद्दल प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात, 'दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा विजय ही एक ऐतिहासिक घटना आहे. विजय हा एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. सदाशिवराव भाऊ वगळता कोणीही हे करू शकले नव्हते. मराठा शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारी ही एक मोठी घटना आहे आणि मला हा विजय साजरा करणारे गाणे हवे होते. अजय-अतुल यांची रचना आणि जावेदसाहेबांचे गीत केवळ मराठ्यांचे धैर्यच साकारत नाही तर महान वीरांना एक श्रध्दांजली आहे.' या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन राजू खान यांनी केलं आहे. पानिपत सिनेमाची निर्मिती सुनिता गोवारीकर आणि रोहित शेलटकर यांची कंपनी व्हिजन वर्ल्ड यांनी केली आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सॅनन यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. पानिपत हा सिनेमा जगभरात येत्या ६ डिसेंबरला रिलायन्स एंटरटेनमेंट रिलीज करणार आहे.