सोनू सूद पुन्हा बनला नायक, १०० विद्यार्थ्यांना वाटले स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:34 PM2021-01-09T13:34:40+5:302021-01-09T13:39:18+5:30
आता पुन्हा एकदा सोनूने तो खऱ्या आयुष्यात नायक असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे, बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतः खर्च करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. त्यामुळे चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात नायक बनला.
आता पुन्हा एकदा तो खऱ्या आयुष्यात नायक असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या शाळा बंद असून ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जात आहे. पण अनेक मुलांकडे लॅपटॉप, संगणक, स्मार्टफोन नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अशा मुलांना योग्यप्रकारे शिक्षण घेता यावे यासाठी सोनूने १०० विद्यार्थ्यांना स्मार्टफोन दिले. कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनू सूदने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले.
सोनू सूदचा एक मित्र कोपरगाव येथे राहातो. त्याचा मित्र विनोद राक्षेला विद्यार्थ्यांची ही अडचण माहीत होती. त्यानेच याविषयी सोनूला सांगितले आणि सोनू लगेचच या मुलांना मदत करण्यासाठी तयार झाला. तो शिर्डीला दर्शनासाठी गेला होता. तिथून थेट त्याने कोपरगाव गाठले आणि स्वतःच्या हाताने मोबाईलचे वाटप केले.
सोनू सूदने लोकांना लॉकडाऊनच्या काळात प्रचंड मदत केली होती. सोनू सूदने केलेल्या समाजसेवेनंतर तो राजकारणात देखील प्रवेश करणार असे म्हटले जात होते. याबाबत त्यानेच एका वेबसाईटला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. सोनूला बॉलिवूड हंगामाच्या मुलाखतीत विचारण्यात आले होते की, आजवर अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तुझा राजकारणात प्रवेश करण्याचा काही विचार आहे का? त्यावर त्याने सांगितले होते की, एक अभिनेता म्हणून मला खूप काही करायचे आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी माझी अनेक स्वप्नं होती. त्यातील काही आजही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ती स्वप्नं पूर्ण करण्याचा मला भविष्यात प्रयत्न करायचा आहे. राजकारणात प्रवेश करण्याचे वय कोणतेही असू शकते. मला १० वर्षांपूर्वी राजकारणात येण्याची ऑफर आली होती. पण त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मला आजही अनेक ऑफर येतात.पण त्यात मला सध्या तरी रस नाहीये.