दिवसरात्र कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूद करतोय जीवाचे रान, असा आहे त्याचा सध्याचा दिनक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 04:25 PM2021-05-08T16:25:32+5:302021-05-08T16:25:56+5:30
कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद जशी जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसतोय.
देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनू सोदूनेदेखील पुढाकार घेतला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. जसे जमेल तशी सोनू सूद प्रत्येकाला मदत करताना दिसतोय. गेल्या वर्षभरापासून तो फक्त ५ तास झोपतो आणि २२ तास काम करतोय. इतकंच नाही तर जवळपास तो २२ तास फोनवर बोलत असतो.
सोनू सूदने एका चॅनेलशी बोलताना त्याच्या आगामी योजनांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, सरकारही त्यांच्यापरीने सर्वांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र एकाच वेळी सर्वांपर्यंत पोहचणे शक्य नसल्यामुळे प्रत्येकाने जमले तितकी मदत करायला हवी. गरजू लोकांना वेळत मदत पोहोचवणे खूप गरजेचे आहे. हे सर्व आम्ही कसे करतो हे आमचे आम्हालाही माहित नाही. मी दिवसाचे जवळपास २२ तास फोनवर असतो. आम्हाला दिवसभरातून ४० ते ५० हजार मदतीसाठी फोन येतात.'
सोनू सूदची दहा जणांची टीम फक्त रेमेडिसीवीरसाठी फिरत असतात. एक टीम बेडसाठी फिरत असते. प्रत्येक शहरानुसार हे काम सुरू असते. देशातील अनेक डॉक्टरांशी मी बोलत असतो. ज्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तातडीने पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ज्या लोकांना आम्ही आधी मदत केली आहे, ते आमच्या या मदकार्यात स्वतःहून सहभागी होत असल्यामुळे मदत करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, असे सोनू सांगत होता.
केवळ इतकेच नाही तर सध्याच्या काळात नकारात्मक विचार आणि रागवत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. या काळात लोकांनीही न चिडता आपले लक्ष लोकांना मदत कशी करता येईल, यावर लक्ष द्यायला हवे, असे सोनू म्हणाला.
कामात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल सोनू म्हणाला की, जास्त अडचणी या नवीन शहरात काम करताना येतात. तेव्हा तिथे तुमचा कोणताही संपर्क नसतो. अशावेळी तिथल्या लोकांना आमच्याशी जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेकदा लहान गावात जाण्याचे साधन नसते तेव्हा आम्ही आमच्या गाड्या घेऊन तिथे जातो आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेतो. हॉस्पिटलची अवस्थाही फार वाईट असते तेव्हा अडचणी जास्त वाढतात.