अत्यंत हलाखीच्या अवस्थेत दर्ग्याबाहेर सापडली होती साऊथची ही सुपरस्टार, शरीराला लागले होते किडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 08:00 AM2020-07-12T08:00:00+5:302020-07-12T08:00:04+5:30
या अभिनेत्रीला धोक्याने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले आणि यानंतर तिच्या वाट्याला एक दु:खद अंत आला.
बॉलिवूडमध्ये सध्या नेपोटिजमचा मुद्दा गाजतोय. खरे तर नेपोटिजम, कास्टिंग काऊच सारख्या गोष्टी केवळ बॉलिवूडमध्येच नाहीत तर दुस-या फिल्म इंडस्ट्रीतही आहेत. 80 व 90 च्या दशकातील प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री निशा नूर अशाच धोक्याची शिकार ठरली होती. निशा नूरची लोकप्रियता इतकी होती की, रजनीकांत, कमल हासन सारखे सुपस्टार्स तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असत. पण नंतर या अभिनेत्रीला धोक्याने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले आणि यानंतर तिच्या वाट्याला एक दु:खद अंत आला. मरताना तिच्या हाडांचा सापळाच तेवढा उरला होता.
निशा नूर या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. कल्याणा अगातिगल , अय्यर द ग्रेट, टिक टिक टिक, चुवाप्पू नाडा असे तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. अनेक चित्रपटातील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. निशाने तिच्या अभिनयाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले होते. पण एवढी लोकप्रियता मिळून देखील निशाच्या आयुष्याचा शेवट खूपच वाईट झाला. शेवटच्या क्षणी तिचे प्रचंड हाल झाले.
1981 साली आलेला टिक टिक टिक, यानंतर आलेला कल्याण अगातिगल आणि 1990 मध्ये आलेला अय्यर द ग्रेट या सिनेमातील निशाच्या कामाचे प्रचंड कौतुक झालेत. इतकेच नाही तर बॉक्स आॅफिसवरही हे सिनेमे हिट झालेत. मात्र यानंतर काही वर्षांनंतर अचानक निशाला काम मिळणे बंद झाले. ती आर्थिक अडचणीत सापडली.
याच काळात तिची एका निर्मात्यासोबत ओळख झाली. या निर्मात्याने तिला फसवले आणि तिला वेश्या व्यवसायात ढकलले. एकदा या व्यवसायात पडल्यानंतर तिथून बाहेर पडणे निशासाठी खूप कठीण झाले. इंडस्ट्रीने तिच्याकडे पाठ फिरवली.
निशाची नंतरच्या काळात अवस्था एवढी वाईट झाली होती की, तिला ओळखणे देखील कठीण झाले होते. तिच्या या वाईट काळात इंडस्ट्रीतील कोणीच तिला आधार दिला नाही. एवढेच काय तर तिला कोणी भेटायला देखील आले नाही. निशा प्रसिद्धीझातोत असताना तिच्याकडे प्रचंड पैसा होता. पण ती शेवटच्या काळात रस्त्यावर भीक मागताना दिसली. उपचार करण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते.
अखेरच्या दिवसांत निशा एका दर्ग्याबाहेर मरणासन्न अवस्थेत आढळली होती. तिच्या शरीराला किडे लागले होते. निशा शेवटच्या क्षणी अतिशय वाईट परिस्थितीत होती. एका एनजीओने तिला चेन्नईच्या रूग्णालयात दाखल केले. पण काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, तिला एड्स झाला होता. 2007 साली केवळ वयाच्या 44 वर्षी निशाने जगाचा निरोप घेतला.