धनुष-ऐश्वर्याने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज, १८ वर्षांचा संसार अखेर मोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:57 PM2024-04-08T17:57:06+5:302024-04-08T17:57:44+5:30
दोघांना १८ वर्षीय 'यात्रा' आणि १४ वर्षीय 'लिंगा' ही दोन मुलं आहेत.
रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी दिग्दर्शिका ऐश्वर्या (Aishwarya) आणि अभिनेता धनुष (Dhanush) यांचा १८ वर्षांचा संसार अखेर मोडला आहे. गेल्या २ वर्षांपासून दोघंही वेगळे राहत होते. आज त्यांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केला. माध्यम रिपोर्टनुसार, त्यांनी चेन्नई कोर्टात घटस्फोटाची याचिका केली आहे. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांची कस्टडी कोणाकडे असेल याबाबत लवकरच कोर्टाच्या सुनावणीत स्पष्टता मिळेल.
धनुष आणि ऐश्वर्याने 2004 साली लग्न केले होते. दोघांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र 2022 मध्ये त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. ऐश्वर्या धनुषचं घरही सोडलं. यादरम्यान रजनीकांत आणि कुटुंबाने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलेलं दिसत नाही. कारण अखेर त्यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचं आता उघड झालं आहे.
जानेवारी २०२२ मध्ये धनुषने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले होते की,"आम्ही १८ वर्ष एकमेकांचे मित्र, जोडीदार, मुलांचे पालक आणि एकमेकांचे हितचिंतक बनून राहिलो. आज आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत जेणेकरुन एकमेकांना समजून घेऊ शकू."
२००४ साली लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी २००६ साली ऐश्वर्याने 'यात्रा' या मुलाला जन्म दिला. तर त्याच्या ४ वर्षांनी 2010 साली त्यांना 'लिंगा' हा मुलगा झाला. धनुष नेहमीच मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. धनुषचा यावर्षी 'कॅप्टन मिलर' सिनेमा रिलीज झाला. तर ऐश्वर्याने 'लाल सलाम' सिनेमा दिग्दर्शित केला. यामध्ये रजनीकांत यांचीही भूमिका होती.