"माझ्या शत्रूसोबतही असं होऊ नये..." नेमकं काय म्हणाली समांथा रुथ प्रभू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:03 IST2025-04-14T14:03:08+5:302025-04-14T14:03:23+5:30
समांथा रुथ प्रभूनं आयुष्यातल्या कठीण टप्प्याबद्दल केलं भाष्य, म्हणाली...

"माझ्या शत्रूसोबतही असं होऊ नये..." नेमकं काय म्हणाली समांथा रुथ प्रभू?
Samantha Talk About Her Health: सामान्य लोकांप्रमाणेच स्टार्ससाठीही आयुष्य सोपं नाही. कधी कारकिर्दीत तर कधी वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ-उतारांचा त्यांना सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचंही (Samantha Ruth Prabhu) असं काही झालं आहे. नागा चैतन्यापासून घटस्फोटच्या धक्क्यातून सावरते नाही, तर तिच्या आयुष्यात आजार म्हणून दुसरं संकट उभं ठाकलं. समंथाला त्वचेशी निगडीत मायोसायटिस नावाचा आजार झाला. घटस्फोटानंतर मायोसिटिससारख्या आजाराविरुद्ध तिनं एकटीने लढा दिला. हे सर्व त्याच्यासाठी सोपे नव्हते. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. या संपुर्ण संघर्षमय प्रवासावर तिनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने भाष्य केलं.
नुकतंच समांथानं फूडफार्मरला (Foodpharmer) मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीमध्ये तिनं मायोसायटिस या आजारावर कसा उपचार घेतला आणि किती त्रास सहन करावा लागला, याबद्दल सांगितलं. समांथा म्हणाली, "जेव्हा मला या आजाराचं निदान झालं, तेव्हा मी पूर्णपणे एकटी होते. मला कुठून सुरुवात करावी हेदेखील कळत नव्हतं. आजारी पडलो की आपण आठवडाभर औषध घेतो आणि बरे होते, हेच मी पाहात आले होते. पण, मायोसायटिस हा एक जुनाट आजार आहे. हा आजार संपूर्ण आयुष्य असाच राहतो आणि पुढे परिस्थिती आणखी बिकट होते. या सर्व गोष्टी मला कळाल्यानंतर मी अस्वस्थ झाले. मला असहाय्य वाटायचं".
पुढे समांथा म्हणाली, "माझ्या समोर माझं संपुर्ण आयुष्य पडलं होतं. मला अनेक गोष्टी करायच्या होत्या. लोकांना जेव्हा माझ्या आजाराबद्दल कळालं, तेव्हा सर्वांनी मला एकच प्रश्न विचारला की आता अभिनयाचं काय होईल. तु अभिनय करू शकशील का? तुझा प्लॅन बी काय आहे? लोकांच्या या प्रश्नावर मला खूप राग यायचा. मी म्हणायचे, माझ्याकडे कोणताही प्लॅन बी नाहीये, मला फक्त अभिनय करायचा आहे. मला वाटतं हा आजार माझ्या शत्रूलाही होऊ नये".
समांथाला झालेल्या दुर्मिळ आजाराविषयी...
मायोसायटिस या आजारामध्ये स्नायूंना सूज येते. स्नायू दुखावल्यामुळे प्रचंड थकवाही येतो. मायोसायटिसचे प्रकार आहेत. यातल्या काही प्रकारांमध्ये त्वचेवर रॅशही येते. स्नायूंमध्ये प्रचंड वेदना, गिळायला होणारा त्रास, श्वास घ्यायला होणारा त्रास अशी या आजाराची काही ढोबळं लक्षणं आहेत. या आजाराचं निदान करणं हे कठीण आहे.
समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची अॅक्शन-थ्रिलर सीरिज 'सिटाडेल हनी बनी' मध्ये दिसली होती. या मालिकेत समांथासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. राज आणि डीके दिग्दर्शित या मालिकेत समांथा एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती. 'सिटाडेल हनी बनी' चा प्रीमियर ७ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.