"मी बॉलिवूड शब्दाचा फॅन नाही" अल्लू अर्जुनचं विधान चर्चेत, 'छावा'सिनेमा बद्दल काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:41 IST2025-02-09T14:40:58+5:302025-02-09T14:41:23+5:30
'पुष्पा २' हा भारतात सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

"मी बॉलिवूड शब्दाचा फॅन नाही" अल्लू अर्जुनचं विधान चर्चेत, 'छावा'सिनेमा बद्दल काय म्हणाला?
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा २' ने जागतिक स्तरावर १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अल्लू अर्जून याने बॉक्स ऑफिसवर सलमान खान, शाहरुख खान यांच्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडलेत. 'पुष्पा २' हा भारतात सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. नुकतंच शनिवारी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जूनने चाहत्यांचे, दिग्दर्शक सुकुमार आणि एका बॉलिवूड दिग्दर्शकाचे आभार मानलेत.
अल्लू अर्जून बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळल्याबद्दल एका बॉलिवूड चित्रपट निर्मात्याचे आभार मानले. पण, त्याने त्या चित्रपटाचं नाव घेतलं नाही. पण, तो चित्रपट छावा असल्याचा अंदाज नेटकऱ्यांचा आहे. कारण, छावा हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. पण, तो पुढे ढकलण्यात आला होता.
अल्लू अर्जूनने म्हटलं, "त्यादिवशी मी बॉलिवूडमधील... बॉलिवूड या शब्दाचा चाहता नाही. मी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका व्यक्तीला फोन केला. त्यांचा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्यांनी खूप मदत केली आणि तारीख पुढे ढकलली. मी स्वतः त्यांना फोन केला आणि तारीख वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानले".
'पुष्पा २' च्या यशाबद्दल अल्लू अर्जुनने दिग्दर्शक सुकुमार आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी चित्रपटाचे वर्णन 'फक्त एक चित्रपट नाही तर एक भावना' असं केलं. तो म्हणाला,"माझ्यासाठी पुष्पा हा चित्रपट नाही. हा ५ वर्षांचा प्रवास आहे. ही एक भावना आहे".संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अटक आणि जामीन मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी अल्लू अर्जून पहिल्यांदा कार्यक्रमात पोहचला होता.