'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:42 AM2024-12-02T11:42:01+5:302024-12-02T11:42:56+5:30
Shreyas Talpade Pushpa 2 : 'पुष्पा' सिनेमातील मुख्य पात्र पुष्पाराजला हिंदीत अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला होता. त्याच्या आवाजाला खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर आता सीक्वललाही त्यानेच आवाज दिला आहे. श्रेयसने त्यासंदर्भात सोशल मीडियावर त्याचा अनुभव आणि उत्सुकता शेअर केली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा: द राइज' चित्रपट (Pushpa:The Rise) २०२१ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता 'पुष्पा २: द रूल' (Pushpa 2:The Rule) सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुष्पा सिनेमातील मुख्य पात्र पुष्पाराजला हिंदीत अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)नं आवाज दिला होता. त्याच्या आवाजाला खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर आता सीक्वललाही त्यानेच आवाज दिला आहे. श्रेयसने त्यासंदर्भात सोशल मीडियावर त्याचा अनुभव आणि उत्सुकता शेअर केली आहे.
श्रेयस तळपदेने पुष्पा २मधील काही सीन शेअर करत डबिंग करतानाचीही झलक शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून नॅशनल नहीं, इंटरनॅशनल है में! आम्ही खूप पुढे आलो आहोत. पुष्पा २ आठवडा अधिकृतपणे सुरू झालाय, आणि मी अधिक उत्साहित आहे. पुष्पा २साठी मला डब करण्याची पुन्हा संधी मिळाली आणि माझ्या आवाजाला तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम मिळाले, त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे.
पुढे श्रेयसने अल्लू अर्जुनच्या कामाचं कौतुक केलं. तो म्हणाला की, पुष्पाराज उर्फ अल्लू अर्जुनबद्दल बोलायचं झालं तर काय एनर्जी आहे यार! तुझा प्रभावी अभिनय प्रत्येकवेळेला डब करताना नवीन उर्जा देतो. तुझा स्वॅग, आत्मविश्वास, बॉडीलँग्वेज आणि एनर्जी खूप प्रेरणादायी आहे. डबिंगचा छान, आनंदी आणि अप्रतिम अनुभव देण्यासाठी मानव भाई, राज, वीरू, सनी आणि डबिंगची संपूर्ण टीमचा मी आभारी आहे. तुमची कठोर मेहनत स्क्रीनवर दिसते आहे. शेवटी, प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आपले विचार सामायिक करा!
पुष्पा २: द रुलमध्ये दिसणार हे कलाकार
पुष्पा २: द रुलचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याआधी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा द राइज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने अल्लू अर्जुनला संपूर्ण भारतातील स्टार म्हणून स्थापित केले. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला होता.