'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:56 AM2024-12-02T11:56:37+5:302024-12-02T11:57:40+5:30
'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात एका माणसाने तक्रार नोंदवलीय. काय घडलंय नेमकं? बघा
'पुष्पा 2' ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा त्याची गाजलेली पुष्पाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या सगळीकडे 'पुष्पा 2'ने चांगलाच धुमाकूळ घातलाय. अशातच 'पुष्पा 2'च्या रिलीजआधी अल्लू अर्जुनला मोठा फटका बसलाय. अल्लू अर्जुनविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. 'पुष्पा 2'च्या प्रमोशनदरम्यान एक शब्द अभिनेत्याला चांगलाच भोवला असून त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
अल्लू अर्जुनला तो एक शब्द भोवला? काय घडलं?
'पुष्पा 2'फेम अल्लू अर्जुनविरोधात हैदराबाद येथील जवाबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय. ग्रीन पीस एनवायरमेंट एंड वॉटर हार्वेस्टिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास गौड यांनी ही तक्रार नोंदवली आहे. प्रकरण असं आहे की, अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी मुंबईत 'पुष्पा 2'च्या प्रमोशनल इव्हेंटला आलेला. त्यावेळी त्याने त्याच्या फॅन बेसला उद्देशून 'आर्मी' हा शब्द वापरला. याच शब्दावर श्रीनिवास गौडा यांनी आक्षेप घेतलाय.
श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "आम्ही टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुनविरुद्ध तक्रार दाखल केलीय. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या फॅन बेसला 'आर्मी' नावाने संबोधित करु नये. कारण हा शब्द खूप सन्मानपूर्वक वापरला जातो. आर्मी हा शब्द आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी वापरला जातो. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या शब्दाचा उपयोग करु शकता." आता पोलीस या तक्रारीविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान 'पुष्पा 2' ५ डिसेंबरला रिलीजसाठी सज्ज आहे.